कंत्राटदार कंपनीवर हलगर्जीचा आरोप

खड्डय़ामुळे दुचाकीवरून पडल्यामुळे मागून येणाऱ्या कंटेनरची धडक बसून महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात सिडकोच्या अधिकाऱ्यांचा काहीही दोष नसल्याचे सांगत सिडकोने हात वर केले आहेत. जे. एम. म्हात्रे इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीने रस्ता दुरुस्तीदरम्यान बंद न ठेवल्यामुळे अपघात झाल्याचे सांगत सिडकोने हात झटकले आहेत. पोलिसांनी स्पष्टीकरण मागितल्यापासून तब्बल ११ दिवसांनी सिडकोने हे उत्तर दिले आहे. संबंधित कंपनी शेकापचे नेते व पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या मालकीची आहे. परिणामी सिडकोच्या स्पष्टीकरणामुळे म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

खारघर येथील उत्सव चौकात १४ ऑक्टोबरला शिल्पा पुरी यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या मेट्रो प्रकल्पाच्या पुलाखालील रस्त्याच्या बांधकाम आणि देखभालीचे कंत्राट जे. एम. म्हात्रे इन्फ्राया कंपनीकडे आहे. या कंपनीला रस्ता बांधण्यासाठी २०१५ ते २०१७ असा कालावधी देण्यात आला होता. पुढील १० वर्षे देखभाल करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारावरच होती. रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदार कंपनीने कोणतेही सूचना फलक लावले नाहीत आणि रस्ता बंदही ठेवला नाही, असे निरीक्षण सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या स्पष्टीकरणात नोंदविले आहे.

शिल्पा पुरी यांच्या अपघाती मृत्यूनंतर परिसरातील रहिवाशांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती, मात्र सिडकोचे अधिकारी कंत्राटदाराकडे बोट दाखवून स्वत: नामानिराळे राहिले आहेत. सिडकोच्या स्पष्टीकरणानंतर विधि विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील तज्ज्ञांचा सल्ला खारघर पोलिसांनी मागविल्याचे समजते. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी निष्क्रिय ठेकेदारावर वचक का ठेवला नाही, असा प्रश्नही रहिवासी करत आहेत.

अभियंत्याला अटक

सिडकोच्या या स्पष्टीकरणानंतर खारघर पोलिसांनी जे. एम. म्हात्रे कंपनीचा २९ वर्षीय अभियंता अश्विन घरपनकर याला शुक्रवारी अटक केली, त्याची लगेचच जामिनावर सुटका झाली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे खारघर पोलिसांनी सांगितले. शेकापचे बडे नेते व माजी नगराध्यक्ष जनार्दन म्हात्रे यांची ही कंपनी असल्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा आहे. शिल्पा यांना धडक देणारा क्रेनचालक अशोक जैसवाल याला पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. शिल्पा यांचे पती अमित यांनी यापूर्वीही या प्रकरणात सिडकोच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.