रेल्वे स्थानकांची कामे वेगाने पूर्ण करण्याचा सिडकोचा प्रयत्न

नेरुळ-उरण रेल्वेमार्गावरील नेरुळ ते खारकोपर या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. पहिला टप्पा मेअखेपर्यंत सुरू करण्यासाठी सिडको व रेल्वे कंबर कसली आहे. बांधकाम व्यावसायिकांनीही रेल्वे सुरू होण्याच्या आशेने घरांचे भाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे उद्घाटन झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष नेरुळ-उरण रेल्वेकडे लागले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांनी नेरुळ ते खारकोपर हा पहिला टप्प्या डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सुरुवातीला ठेवले होते. त्यानंतर हा टप्पा मार्चपर्यंत सुरू होईल असे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले. आता पुन्हा मेअखेपर्यंत पहिला टप्पा सुरू करण्यासाठी सिडको व रेल्वेने प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु या पट्टय़ातील रहिवाशांना कधी एकदा या मार्गावर रेल्वे धावते असे झाले आहे. बांधकाम व्यावसायिकांनीही रेल्वे सुरू होण्याच्या आशेने घरांचे भाव वाढवले आहेत. नेरुळ-खारकोपरनंतर पुढील मार्गासाठी भूसंपादनात अडचणी आल्या होत्या. त्यामध्ये वनजमिनीच्या ४ हेक्टर जागेचा प्रश्न प्रलंबित होता. तोही निकालात निघाल्याने या मार्गावरील मोठा अडथळा दूर झाला आहे. दुसरीकडे नेरुळ ते खारकोपर या पहिल्या टप्प्यातील मार्गाकडे सिडकोने संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. मेअखेपर्यंत या पहिल्या टप्प्यातील मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, असे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिडकोने रेल्वेस्थानकांच्या उभारणीच्या कामाचा सपाटा लावून खारकोपर स्थानकापर्यंतची कामे मेपर्यंत पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे. दुसरीकडे रेल्वेनेही रविवारी आठ तासांचा मेगाब्लॉक घेऊन नेरुळ, सीवूड्स दरम्यानची अनेक कामे केली आहेत. नेरुळ ते सीवूड्स दरम्यान रात्रंदिवस काम सुरू आहेत. त्यामुळे खारकोपपर्यंतच्या मार्गावर प्रत्यक्षात लोकल कधी धावणार याबाबत उलवे परिसरातील नागरिकांना व बांधकाम व्यावसायिकांना उत्सुकता आहे. रेल्वे सुरू झाली की आमच्या भागातही विकासाची गंगा पोहचणार, असा विश्वास उलवे परिसरात रहिवाशांना आहे. त्यामुळे ते कधी सुरू होणार या प्रतीक्षेत आहेत.

नेरुळ-खारकोपर या ८ किमीच्या मार्गात नेरुळ, सीवूड दारावे, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशी स्थानके आहेत. यातील सागरसंगम स्थानक प्रस्तावित आहे.परंतु पहिल्या टप्प्यातील कामात स्थानकाभोवतालचा खारफुटीचा भाग व जवळपास लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात नसल्याने सागरसंगम स्थानक आता उभारले जाणार नाही. या रेल्वे मार्गात सिडकोची ६७ टक्के तर रेल्वेची ३३ टक्के भागीदारी असून या मार्गावरील नेरुळ, सीवूडस, बामणडोंगरी, खारकोपर स्थानकांत अंतर्गत कामे सुरू आहेत.

सीवूड्स पुढील रेल्वे स्थानकांची उभारणी सुरू आहे. रेल्वे रूळ टाकण्यासाठीच्या विशेष रेल्वे लिंकिंगचे काम वेगात सुरू झाले आहे. दुसरीकडे सर्वच स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी केली असता या मार्गावर रेल्वे धावण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत. उलवे भागात मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले असून बांधकाम व्यावसायिकांना रेल्वेची प्रतीक्षा आहे. नेरुळ खारकोपर या मार्गावरील पहिले स्थानक नेरुळ आहे. या स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ व ६ वरून नेरुळ खारकोपर रेल्वेगाडी धावणार आहे. सध्या या स्थानकात वेगाने काम सुरू आहे.

या मार्गावरील सीवूड्स दारावे हे दुसरे रेल्वे स्थानक असून तिथे या नव्या मार्गासाठी ३ व ४ क्रमांकाच्या फलाटांचे काम वेगात सुरू आहे.

तरघरला सुरुवातीला थांबा नाही

नेरुळ-खारकोपर मार्गावरील तरघर स्थानक उभारणीचे काम नोव्हेंबर २०१७ ला सुरू झाले आहे. हे स्थानक विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून फलाट उभारणीसाठी एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे तरघर स्थानकाचे काम आव्हानात्मक ठरणार आहे. आतापर्यंत या स्थानकाचे फक्त २५ टक्के काम झाले आहे. त्यामुळे या मार्गावर मे महिन्यात रेल्वे सुरू झाली तरी सुरुवातीला या स्थानकावर थांबणार नाही.

नेरुळ-खारकोपर रेल्वे मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी सिडकोचे व रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. मेअखेपर्यंत रेल्वे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बामणडोंगरी तसेच खारकोपर रेल्वेस्थानकाचे ७५ टक्के काम झाले असून उर्वरित काम मेपर्यंत पूर्ण होईल. तरघर स्थानकाचे बरेच काम शिल्लक आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरुवातीला तरघर स्थानकावर थांबवली जाणार नाही.

–  एस. के. चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको रेल्वे प्रकल्प