|| विकास महाडिक

काळ्या व्यवहाराच्या नोंदीसाठी चोपडा

गेल्या काही वर्षांत संगणकाच्या वाढलेल्या वापरामुळे व्यापारी जगतात होणारे चोपडापूजन आता केवळ नावापुरतेच शिल्लक राहिले आहे. संगणकाच्या वेगवेगळ्या प्रणालीमुळे आता एका क्लिकसरशी सर्व व्यवहार संगणकात राखून ठेवले जात आहेत, पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चोपडापूजनाची परंपरा व्यापारी आजही पाळत आहेत. चोपडा हा केवळ देणी आणि घेण्याच्या आर्थिक व्यवहार मर्यादित आहेत. यात काळ्या पैशांचीच जास्त नोंद होत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

नवी मुंबईतील पाच घाऊक बाजारपेठा या आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी दहा ते बारा हजार व्यापारी एकाच वेळी व्यापार करीत आहेत. तीन हजार कोटीपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल असलेल्या या बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणाऱ्या चोपडापूजनाचे अन्यन्य महत्व आहे.   बाजारपेठेत संगणक वापराचे प्रमाण वाढल्यानंतर ही वही काहीशी अडगळीत पडल्यासारखे वाटते. गेली अनेक वर्षे या चोपडय़ाशिवाय व्यापाऱ्यांना दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे चोपडा तयार करणाऱ्या प्रिंटर्सला एक वेगळे महत्त्व होते. एखाद्या व्यापाऱ्याकडे एकाच हिशोबाच्या दोनपेक्षा जास्त वह्य़ादेखील ठेवल्या जात होत्या. त्यामुळे दिवाळीत पाच ते सहा हजार रुपयांची चोपडा खरेदी प्रत्येक व्यापारी करीत असल्याचे चोपडा व्यापाऱ्यांनी सांगितले. ही खरेदी आता ५० टक्क्य़ाने कमी झालेली आहे. संगणक बाजारात आल्यापासून सर्व व्यापाऱ्यांचे व्यवहार हे या संगणकाद्वारे केले जात आहेत मात्र दिलेली उधारी, कर्ज किंवा घेतलेले कर्ज आणि काळ्या बाजारात विकलेले माल याची नोंद ही या चोपडात केली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना चोपडय़ाशिवाय दुसरा पर्याय नाही हे दिसून आले आहे.

चोपडा पूजन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केले जाते. या दिवशी आजूबाजूचे सात आठ व्यापारी एकत्र येऊन हे चोपडापूजन करतात. या दिवसापासून चोपडय़ामधील नोंदी नव्याने करण्यास सुरुवात केली जाते. अनेक व्यापारी हे व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत असतात. या दिवशी हे पैसे परत घेण्याची प्रथा असून चार दिवसाने ते गरज असल्यास पुन्हा व्याजाने देण्याची पद्धत आहे.

मागील काही वर्षांपासून चोपडा विक्री कमी झाली आहे. यापूर्वी पाच ते सहा हजार रुपयांचे चोपडा घेणारे व्यापारी आता अर्धी खरेदी करीत आहेत, पण चोपडापूजनासाठी नवीन चोपडा खरेदीशिवाय व्यापाऱ्यापुढे दुसरा पर्याय नाही. चोपडापूजनाबरोबर काही व्यापारी आता संगणकाची पूजादेखील करतात.    -कुणाल शाह, स्वस्तिक बुक डेपो, एपीएमसी

चोपडापूजनाची एक वेगळी मजा आहे. मित्रमंडळी, नातेवाईक व्यापारी एकत्र येऊन चोपडापूजन करतात. हे पूजन मुहूर्त बघूनच केले जाते. दोन ते तीन तासाचे हे पूजन व्यापाऱ्यांना एक नवीन ऊर्जा देणारे ठरते.    -हितेन जोशी, व्यापारी, मसाला मार्केट, एपीएमसी