रेल्वेच्या चुकीच्या उद्घोषणेचा फटका ट्रान्स हार्बर मार्गावरील शेकडो प्रवाशांना बसला. उद्घोषणेप्रमाणे प्रवासी वाशीहून ठाण्याला जाण्यासाठी लोकलमध्ये बसले. मात्र, ही गाडी थेट सानपाडा कारशेडमध्ये गेल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला.

वाशी रेल्वे स्थानकावर मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. वाशी स्थानकावर फलाट क्रमांक एकवर ठाण्याला जाणारी धिमी लोकल येत असल्याची उद्घोषणा होताच सवयीने प्रवासी आत चढले. लोकल सुरू होऊन ती सानपाडा फलाटाच्या रूळांवरून न जाता कारशेडच्या रूळांवरून जात असल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. ही रेल्वे कारशेडमध्येच जाणार होती. मात्र, चुकीच्या उद्घोषणेमुळे फसगत झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा ही गाडी वाशी स्थानकात आणण्याची सूचना केली. सर्व प्रवासी वाशी स्थानकावर उतरले आणि रिकामी लोकल सानपाडा कारशेडला न जाता मानखुर्दच्या दिशेने रवाना झाली. रेल्वेच्या या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.