‘लोकसत्ता आरोग्यमान भव’च्या वाशी येथील परिसंवादाला उदंड प्रतिसाद

स्पध्रेच्या युगात घडय़ाळय़ाच्या काटय़ाप्रमाणे सुरू असणारी वेगवान जीवनशैली अंगीकारलेल्या शहरवासीयांना आरोग्याच्या अनेक समस्यांनी चिंताग्रस्त केले आहे. शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही ढासळू लागले आहे. आरोग्यासंदर्भात असणारी असुरक्षितता व रोगाचे वाढते प्रमाण यामुळे शारीरिक व मानसिक तणावाचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होत आहे. अशा वेळी आहार, विहार आणि आचरणामध्ये संतुलितपणा राखून निरोगी आयुष्य जगता येऊ शकते, हा आरोग्याचा मंत्र हा वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात मान्यवर तज्ज्ञांनी दिला. माधवबाग प्रस्तुत ‘लोकसत्ता आरोग्यमान भव पॉवर्ड बाय पितांबरी’ असलेल्या या परिसंवादाला श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. या वेळी डॉ. अश्विन सावंत यांनी आरोग्याचा राजमार्ग, डॉ राजेंद्र बर्वे यांनी तणावातून पूर्णभानाकडे, तर डॉ. राजेंद्र आगरकर यांनी आधुनिक जीवनशैली विकासांची जननी या विषयांवर मार्गदर्शन केले.

आधुनिक युगात शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे माणसाचे आयुष्यमान घटत चालले आहे. आधुनिक जीवनशैली अंगीकारल्यामुळे फास्टफूड खाण्याकडे कल मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आजारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. प्रकृतीला साजेसा आहार घेण्याऐवजी जिभेचे चोचले पुरविले जात आहेत, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे व्यायामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिवसेंदिवस आजार वाढत आहेत. संतुलित आहाराबरोबर दररोज ३० मिनिटे हलका व्यायाम केल्यास आधुनिक काळातील आजार टाळणे शक्य आहे. रोजच्या जीवनशैलीत बदल करून कोणत्या वातावरणात काय खावे तसेच मानसिक ताणावर नियंत्रण कसे मिळावावे, याबद्दल तज्ज्ञांनी ऊहापोह केला. ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या उपक्रमाला वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात गुरुवारी सुरुवात झाली. या वेळी आहार, जीवनशैली आणि मानसिक स्वास्थ्य या विषयांवरील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रोत्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.

माधवबाग प्रस्तुत ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या कार्यक्रमासाठी असोशिएट पार्टनर जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड, पॉवर्ड बाय पितांबरी प्रॉडक्ट प्राय. लि., हायजिन पार्टनर कमांडर स्लिमहाइड आणि डेंटल केअर पार्टनर श्री डेंटल स्पेशालिटी हॉस्पिटल हॉलिडेज यांचे सहकार्य लाभले आहे.

आज पुन्हा संधी

गुरुवारी या कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्या नागरिकांना शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी या कार्यशाळेचा लाभ घेता येईल. सकाळी १० ते ३ या वेळेत विष्णुदास भावे नाटय़गृहात हा कार्यक्रम होणार आहे.

तणावावर मात करण्यासाठी पूर्णभान आवश्यक

स्पध्रेच्या या युगात आज लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानाच मानसिक तणाव आहे. या तणावावर मात करण्यासाठी पूर्णभान असणे आवश्यक असून जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारणे हा एक उपाय आहे. विपश्यना, विज्ञान, ध्यानधारणा यांसारख्या आपल्या मातीत रुजलेल्या परंपरांमुळे ज्या मातीत आपण जन्मलो आहोत त्या मातीत तणावावरील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.  – डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचारतज्ज्ञ

जीवनशैलीमुळे पुढची पिढी आजारी होण्याची भीती

आज अनेकांची जीवनशैली आळशी बसून राहण्याची, झोपा काढण्याची तसेच व्यायाम न करण्याची झाल्याने हीच जीवनशैली पुढच्या पिढय़ांपर्यंत जात आहे. चुकीच्या आहार पद्धतीमुळे घरातील २ ते ५ वर्षांच्या मुलांना मधुमेहासारख्या आजाराला तोंड द्यावे लागेल. तसेच जेवणानंतर शतपावली करतो तोच दीर्घायुषी होतो, तर पाश्चात्त्य तेल, फळे खाण्यापेक्षा भारतीय फळे, भाज्या, तेल हेच अत्यंत पोषक आहे आणि तेच खावे. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होते. – डॉ. अश्विन सावंत

आचार, विचार व आहाराकडे लक्ष द्या

रोगांचे वाढते प्रमाण पाहता आजारांबाबत प्रचंड असुरक्षितता निर्माण झालेली आहे. आधुनिक जीवनशैलीत जगताना फास्टफूड आणि सोशल मीडिया यामुळे या आजारांत वाढ होत आहे. रोजच्या जीवनशैलीत बदल करून आचार, विचार आणि आहार या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोग्यासाठी ४५ मिनिटे देणे आवश्यक आहे. त्यामध्ये योगा करणे, व्यायाम करावा. – डॉ. राजेंद्र आगरकर