‘मार्ग यशाचा’ उपक्रमात नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
करिअरचा निर्णय घेताना इतरांना काय वाटते यापेक्षा स्वतला कोणत्या गोष्टीतून आनंद मिळू शकतो हे पाहा. भावनात्मक निर्णय न घेता, सकारात्मक, नकारात्मक अशा दोन्ही बाजूंचा विचार करा, असा मोलाचा सल्ला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी दिला. ‘लोकसत्ता- मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.. आणि समोर उपस्थित असलेले शेकडो विद्यार्थी एकाग्र चित्ताने ते दाखवीत असलेला मार्ग यशाचा पाहात होते, ऐकत होते..
नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाटय़गृहात दहावी-बारावीचे विद्यार्थी आणि पालक यांच्या तुडुंब गर्दीत झालेल्या या कार्यशाळेचे प्रास्ताविक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. त्यानंतर सुमारे तासभर चाललेल्या आपल्या भाषणातून तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधत त्यांना करिअरच्या मार्गावरील यशदायी प्रवासाचे कानमंत्र दिले. करिअरची निवड कशी करावी आणि स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जावे याचे मौलिक सल्ले त्यांनी या वेळी दिले. ते म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्या शाखेमधून शिक्षण घेतले याला महत्त्व नाही. विविध शाखांतून आलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवांमध्ये करिअर करता येते. त्यासाठी अनेक सुविधा आणि संधी उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षेत मर्यादित व अचूक उत्तरे तसेच कारणमीमांसा याला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र या परीक्षेत यश आले नाही, तर पर्यायी मार्गही शोधून ठेवणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षेमध्ये केवळ माहिती असणे महत्त्वाचे नाही, तर तिचा योग्य प्रकारे कसा व कुठे वापर करता याला महत्त्व असते.
करिअरची निवड कशी करायची हा सर्वापुढचाच महत्त्वाचा प्रश्न. त्याबाबत मुंढे म्हणाले की, कोणत्याही बाबीवर विचारमंथन करूनच निर्णय घ्यावा व त्याची जबाबदारी स्वतच घ्यावी. अनेकदा प्रतिसाद न देता प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. निर्णय केवळ माहितीच्या आधारावर न घेता, माहितीच्या ज्ञानावर घेणे गरजेचे असते. तेव्हा कोणत्या क्षेत्राकडे जावे याचा ‘सल्ला’ इतरांकडून घेण्यापेक्षा अचूक माहिती घेऊन निवड करा. त्याचा विचार पदवीधर झाल्यानंतर करण्यापेक्षा दहावी-बारावीमध्ये असतानाच तो करा. स्वत: निवडीचा प्रश्न येतो, तेव्हा आपण कोण आणि काय आहोत याचे भान आपणांस असणे आवश्यक असते. तेव्हा आपणांस ओळखण्यास शिका. त्याकरिता स्वतला जाणून घ्या, त्यासाठी स्वतला वेळ द्या. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार न करता वर्तमानकाळाचा विचार करावा. वर्तमान चांगला असेल तर भविष्यकाळ चांगलाच राहील.
‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी’ने सादर केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमाला पॉवर्डबाय म्हणून ‘आयईईआयटी डिझाइन स्टुडिओ’, दिलकॅप महाविद्यालय, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’ आणि ‘सास्मिरा’ आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले आहे.
कला शाखेतूनही प्रशासकीय सेवेच्या स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश गाठता येत असल्यामुळे कला विभागाला कमी लेखू नका. कला शाखेतून शिक्षण घेतलेल्या अनेकांनी राज्यात व देशामध्ये कर्तृत्व गाजविले आहे. प्रशासकीय सेवेतील कर्तृत्ववान अधिकारी, उत्तम शिक्षक, संपादक, रेडिओ जॉकी, कथालेखक, अनुवादक, निवेदक, संगीतकार अशा अनेकांनी याच कला शाखेतून हे यश संपादन केले आहे. अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीने मुंबईमध्ये परदेशी शिक्षण पद्धतीची कवाडे सामान्यांसाठी खुली केली आहेत. या महाविद्यालयामध्ये कला विभागातील विविध संधींचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना घडविले जाते.
– डॉ. मंजिरी वैद्य, प्रमुख, भाषा विभाग, अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी
नियोजनबद्ध पद्धतीने अविरत मेहनत केल्यास विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग गवसतो. दहावी आणि बारावीनंतरची विविध क्षेत्रांतील प्रवेश परीक्षेची व्यवस्थित तयारी केल्यास त्या क्षेत्रात प्रवेशही मिळतो आणि त्या क्षेत्राचे ज्ञानही वाढते. विद्यालंकार क्लासेसमधून अशाच प्रकारे विद्यार्थ्यांकडून नियोजनबद्ध पद्धतीचा अभ्यास करून घेतला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालंकारचा हा विद्येचा यज्ञ सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिकी, वैद्यकीय, आयआयटी आणि आयआयएमसारख्या क्षेत्रांत जाण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या पूर्वपरीक्षेचे शिक्षण येथे दिले जाते.
– प्रा. प्रकाश जकातदार, विद्यालंकार क्लासेस