बाहेरून खरेदीचा सल्ला; गरीब,गरजू रुग्णांना विनाकारण आर्थिक भुर्दंड; रुग्णालयाबाहेरील औषधाचे दुकानही बंद

नवी मुंबई पालिकेच्या सर्व रुग्णालयात रुग्णांना मोफत औषधे देण्याची तरतूद असताना वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील रुग्णांना औषधे बाहेरुन विकत घेण्यास डॉक्टर सांगत आहेत. गेली अनेक माहिने पालिकांच्या रुग्णालयात औषधांचा तुडवडा असल्याने गरीब,गरजू रुग्णांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पालिका वर्षांला सुमारे ७३ कोटी रुपयांची औषधे करीत असते.

नवी मुंबई पालिकेची आरोग्य सेवा तीन स्तरांवर आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात नागरी आरोग्य केंद्र आणि जवळपास माता बाल संगोपन केंद्र आहेत. वाशी सेक्टर नऊ येथे एक मध्यवर्ती सार्वजनिक रुग्णालय असून या ठिकाणी दररोज दोन हजार बाह्य़रुग्ण उपचारासाठी येत असतात. याशिवाय तीनशेच्या वर रुग्ण कायमस्वरूपी उपचारासाठी दाखल झालेले आहेत. ऐरोली आणि नेरुळ येथील १०० खाटांची रुग्णालये बांधून तयार आहेत, पण कर्मचारी व डॉक्टराअभावी ती पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयावर मोठय़ा प्रमाणात ताण वाढलेला आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांत रुग्णांना मोफत औषधे देण्याची तरतूद आहे, मात्र मागील काही माहिन्यांपासून पालिका रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे.

राज्य सरकारने शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील औषधे हे हाफकिनकडून घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हाफकिन ही सर्व औषधे पुरविण्यात कमी पडत आहे. त्यामुळे हाफकिनच्या मंजुरीने ही औषधे घाऊक विक्रेत्याकंडून घेण्याची मुभा आहे. त्यात माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेक औषधे खरेदीला मज्जाव केला होता. त्यामुळे औषधांचा तुटवडा आता जास्त जाणवू लागला आहे. पालिकेने नुकतीच कमी पडू लागलेल्या सलाइनची खरेदी केली आहे पण अनेक औषधे अद्याप पालिका रुग्णालयात आलेली नाहीत. त्यामुळे पालिका रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना तेथील डॉक्टर बाहेरून औषधे खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे रुग्णांना हा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यात वाशी रुग्णालयाबाहेर असलेले मेडिकल स्टोअर गेले अनेक दिवस बंद असल्याने रुग्णांची तारांबळ उडत आहे. औषधे मोफत मिळत नसल्याने पालिका रुग्णालयात येऊन उपयोग नाही अशीही चर्चा सुरू झाली आहे.

औषध खरेदीच्या निविदांना नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. काही विशिष्ठ औषधांचा तुटवडा आहे,पण इतर सर्व औषधे व साहित्यांची ९९ टक्के खरेदी झालेली आहे. औषधांमुळे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वैद्यकीय अधिक्षकांना तीन लाख रुपयांची औषधे खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वच औषधांचा तुटवडा जाणवत आहे,असे म्हणता येणार नाही.  डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई पालिका