शीव-पनवेल मार्गावर जुईनगर ते तुर्भे परिसरात वाहनांच्या रांगा, रेल्वेगाडय़ाही विलंबाने

नवी मुंबईत गेला आठवडाभर तुरळक प्रमाणात झालेल्या पावसाने शनिवारपासून सोमवापर्यंत दमदार हजेरी लावली. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी शीव-पनवेल महामार्गावर जुईनगर स्थानक ते सानपाडा पुलादरम्यान आणि तुर्भे पुलावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे नोकरदारांचे हाल झाले. ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. पनवेलमध्ये कळंबोली पुलाखाली पाणी साचले होते, तर खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे तो बंद ठेवण्यात आला होता. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरही रेल्वे गाडय़ा उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाला.

नवी मुंबई परिसरात शनिवारपासूनच पावसाने जोर धरला होता. रविवारी मध्यरात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडला. सोमवारी पहाटे पावसाचा जोर अधिकच वाढला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली. शीव-पनवेल महामार्गावरील जुईनगर स्थानक ते सानपाडा

व तुर्भे उड्डाणपूल परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तुर्भे पुलावर पडलेले खड्डे व त्यातच कोसळणारा पाऊस त्यामुळे सानपाडा पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सोमवारी पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे तुर्भे येथील सामंत विद्यालयाच्या परिसरात मतदारांची गर्दी झाली होती. मतदारांची वाहने तसेच एपीएमसीकडे जाणाऱ्या मर्गावर पाणी साचल्यामुळे तेथील वाहनेही याच मार्गाने आल्यामुळे सामंत विद्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर चक्का जाम झाला होता. त्यामुळे सानपाडा व तुर्भे ते जुईनगर स्थानकापर्यंत वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू होती. दुपारी तीननंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. वाहतूक पोलिसांचीही जोरदार पावसामुळे तारांबळ उडाली.

ठाणे-बेलापूर मार्गावर पावसामुळे वाहने मंदगतीने धावत होती. उड्डाणपुलांच्या बाजूला असलेल्या सेवा रस्त्यावर पाण्याचा निचरा नीट होत नसल्याने काही भागांत अध्र्या फुटापर्यंत पाणी साचले. उड्डाणपुलावर पडणारे पावसाचे पाणीदेखील बाजूला असलेल्या रस्त्यावर पडत असल्याने तेथे पाणी साचत होते. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पावसाळ्यात वाहने घसरण्याच्या भीतीने तसेच साचलेल्या पाण्यात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालक कमी वेगात वाहन चालवत होते.

ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोलीकडे जाताना पुलाखाली नेहमीप्रमाणे खड्डे पडले असून तेथे पाणी साचले होते. शहरात वाशी व नेरुळ तसेच दिघा परिसरातही पाणी साचले होते. ठाणे-बेलापूर मार्गवरील तुर्भे नाका, सानपाडा-जुईनगर, एस. के. व्हील शोरूम येथे १० ते १५ मिनिटे वाहने वाहतुकीत खोळंबली होती. यामुळे या भागात काही काळ वाहतूककोंडीची झाली. शीव-पनवेल मार्गावर कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल परिसरासह असलेल्या जोरदार पावसाने पनवेल शहरासह ग्रामीण भागाला चांगलेच झोडपून काढले.

पनवेल शहराजीक खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल या भागांत ठिकठिकाणी पाणी साठले होते. शनिवार, रविवार व सोमवारी सलग तीन दिवस झालेल्या पावसाने पनवेल शहरातील पायोनिअर, मिडलक्लास सोसायटी, तालुका पोलीस ठाणे हा भाग सखल असल्याने तेथे पाणी साचले होते. पावसाचे पडसाद पनवेल शहरात सर्वत्र उमटले. शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे ही अर्धवट असल्याने अधिक पाऊस पडल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना अडथळा येत होता. पनवेल एस.टी स्टॅण्ड परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.

कळंबोली पुलाखाली पाणी साठल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. तुर्भे व सानपाडा उड्डाणपुलावर असलेले खड्डे व त्यातच जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी होत होती, परंतु काही ठिकाणे वगळता सर्वत्र मंदगतीने वाहतूक सुरू होती. शीव-पनवेल महामार्गावरील खड्डय़ांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवण्यात आले आहे. खड्डे बुजवल्यास कोंडी होणार नाही. वाहतूक पोलीस तुर्भे येथे मतदान केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. – नितीन पवार, उपायुक्त, वाहतूक विभाग

हार्बर मार्गावरील वाहतूक १० मिनिटे उशिराने सुरू होती, परंतु गाडय़ा सुरू होत्या. ट्रान्स हार्बर मार्गावर मात्र वाहतूक बरीच सुरळीत होती. रेल्वे वाहतूक व्यवस्थित ठेवण्यासाठी वरिष्ठ सतत संपर्कात होते. – ए. एन. सिंग, स्टेशन मास्तर, नेरुळ रेल्वे स्थानक

नवी मुंबई शहरात दोन दिवस चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले, परंतु पावसाचा जोर अधिक असल्याचा तो परिणाम होता. परंतु तात्काळ त्याचा निचराही होत होता. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात होती.   – मोहन डगावकर, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

खांदेश्वर येथे भुयारी मार्गात पाणी साचले असले, तरी पाऊस थांबल्याशिवाय योग्य उपाययोजना करता येणार नाहीत. या मार्गाची देखरेख सिडकोच्या मार्फत होत आहे. त्यामुळे पाणी सिडकोच्या माध्यमातून काढले जात आहे.     – ए. के. जैन, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

एपीएमसी जलमय

एपीएमसीच्या सर्वच बाजारपेठांत पाणी साठले. सर्वाधिक पाणी हे कांदा-बटाटा बाजाराच्या प्रवेशद्वारावर साठले होते. तिथे येणाऱ्या गाडय़ांचा वेग काहीसा मंदावला होता. त्यामुळे बाजाराबाहेर गाडय़ांची रांग लागली होती. कांदा-बटाटा बाजारासमोरील वाशी-तुर्भे रस्ता, वाशी सेक्टर ९ व १० येथील बाजाराचा सखल भाग जलमय झाला होता.

पाणी साचलेली ठिकाणे

उरण-पनवेल मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले. कुंभारवाडा, ग्रामीण रुग्णालय भागातील मार्गही जलमय झाला. येथील गावांत सखल भागात पाणी साचले होते. गणपती चौक, खिडकोळी नाका, मंगलमूर्ती आपार्टमेंट या भागांत पाणी साचले. उरण पूर्व विभागातील अनेक गावांत पाणी साचले. काही ठिकाणी रात्रभर वीजही गायब होती.

तीन दिवसांत पाच वृक्षांची पडझड

तीन दिवसांत शहरात पाच वृक्ष पडले. त्यापैकी तीन वृक्ष सोमवारी दुपारी तीनपर्यंत पडले होते. ऐरोली सेक्टर ३, वाशी सेक्टर १०, सेंट मेरी हायस्कूलनजीक तर तिसरे झाड नेरुळ सेक्टर २१च्या मार्केट परिसरात पडले. यात कोणीही जखमी झाले नाही वा वाहनांचे नुकसान झाले नाही. ऐरोली सेक्टर ३, कोपरखैरणे सेक्टर १६ येथे झाडांच्या फांद्या पडल्या. उरण येथे करंजा मार्गावर झाड कोसळले.