तळोजातील पोलीस त्रस्त; संरक्षणासाठी उपाययोजनांचा अभाव

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये रात्रीच्या वेळी गारठवणाऱ्या थंडीत काम करणारे पोलीस वाढत्या प्रदूषणामुळे त्रस्त झाले आहेत. शहरात प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असून रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी कोणतीही अतिरिक्त उपाययोजना पोलीस दलात नसल्याने पोलिसांना प्रदूषणाच्या विळख्यातच कारखान्यांची सुरक्षा करावी लागत आहे.

औद्योगिक वसाहतीमधील सुमारे ६३० कारखान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तळोजा पोलिसांच्या खांद्यावर आहेत. शंभर पोलिसांच्या खांद्यावर औद्योगिक वसाहतीसह, २८ गावे, तळोजा नोड यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. पोलीस ठाणे हे औद्योगिक वसाहतीच्या मध्यभागी असल्याने येथे रात्रीपाळीत काम करणाऱ्या पोलिसांचे हाल होत आहेत. या भागात प्रत्येक ५० मीटर अंतरावर कारखाने आहेत. विविध प्रकारचे वायू या कारखान्यांमधून उत्सर्जित केले जातात. अशा प्रदूषित हवेत काम करताना पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पर्यावरण विभागाकडून अकरा कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले असूनही प्रदूषणाचे प्रमाण कमी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जलप्रदूषणामुळे तळोजातील नाल्यांमधील पाणीप्रदूषणाची चर्चा सुरू असतानाच आता पोलिसांच्या रात्रीच्या वेळी श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत आहेत. याच दररोजच्या प्रदूषणाला वैतागूण पोलीस ठाण्यालगतच्या पोलीस वसाहतींमध्ये वास्तव्याला पोलीस कुटुंबीयांनी नकार दिला. त्यामुळे या वसाहतींची पडझड झाली.

दररोजच्या प्रदूषणामुळे पोलिसांना होणाऱ्या त्रासाची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी घेत नसल्याने दाद कोणाकडे मागावी असा सवाल पोलीस खासगीत विचारत आहेत. त्यामुळे नाइलाजानेच तळोजात रात्रपाळीसाठीचे काम पोलिसांना करावे लागत आहे.

विशेष म्हणजे पोलिसांच्या आरोग्याच्या प्रदूषणाविरोधातील उपाययोजनांसाठी कोणतीही सामाजिक सेवाभावी संस्था पुढे आलेली नाही. पोलिसांना तोंड व नाक झाकणारे मास्क द्यावेत असाही उपक्रम अद्याप कोणत्याही सेवाभावी संस्थांनी राबविलेला नाही. उद्योजकांच्या कोटय़वधींची संपत्तीची सुरक्षेसाठी पोलीस नेहमी झटतात मात्र त्या उद्योजकांनीही पोलिसांच्या सुरक्षेकडे पाठ फिरवली आहे.

ग्रामस्थांची अवस्था बिकट

खारघर व कळंबोली येथील नागरिक तळोजातील प्रदूषणामुळे आरोग्य बिघडण्याच्या भीतीने ग्रासले आहेत. तर अनेक नागरिकांनी प्रदूषणाची मात्रा हवेत किती यासाठी एमपीसीबी व महापालिकेकडे पाठपुरावादेखील केला आहे. मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये पोलीस ठाण्यात काम करणारे पोलीस दिवसरात्र हाकेच्या अंतरावर याच घातक प्रदूषणाचा त्रास सहन करून सेवा देत आहेत. पोलिसांहून वाईट अवस्था औद्योगिक क्षेत्राच्या मध्यभागी असणाऱ्या तोंडरे, नावडे, पेणधर, घोट, देवीचा पाडा, ढोंगऱ्याचा पाडा, पडघे, नितळस या गावांमधील ग्रामस्थांची आहे.

तळोजा औद्योगिक क्षेत्रातील पोलिसांच्या प्रदूषणाच्या समस्या असण्याची शक्यता आहे. पोलिसांची औद्योगिक क्षेत्र असलेल्या पोलीस ठाण्यात नेमणूक झाल्यावर तेथील प्रदूषणामुळे विशेष आरोग्याची काळजी घेणारी सध्या तरी कोणतीही उपाययोजना नवी मुंबईत अमलात नाही. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या पोलिसांचा कालावधी सहा वर्षांवरून दोन वर्षांचा करण्याची तरतूद आहे का, ते तपासूण घेणे आवश्यक आहे.   – प्रकाश निलेवाड, साहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल</strong>