करोना रुग्णांची सरासरी संख्या ३००च्या आसपास; टाळेबंदीची मुदत आज संपुष्टात

नवी मुंबई</strong> : करोना साथ रोगाचा प्रार्दुभाव दिवसेदिवस वाढत असल्याने नवी मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढण्याची शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. सध्या शहरात ४२ प्रतिबंधित क्षेत्र असून पालिकेने याच भागांना अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित  करताना ‘मिशन ब्रेक द चेन’ राबविण्यात येत आहे. विविध प्रकारच्या तपासण्या वाढविण्यात आल्याने शहरात करोना रुग्णांची संख्या सरासरी ३००च्या आसपास आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने करोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ३१ ऑगस्टपर्यंत निर्बध कायम ठेवले आहेत. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना या निबर्ंधाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. नवी मुंबईत वाढणाऱ्या करोना रुग्णसंख्येमुळे प्रथम ३ ते १३ आणि नंतर १४ ते १९ अशी टाळेबंदी जाहीर केली होती. नवीन आयुक्त अभिजित बांगर यांनी वाढ करून ती ३१ जुलैपर्यंत कायम ठेवली मात्र ही टाळेबंदी केवळ ४२ प्रतिबंधित क्षेत्रात कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, नेरुळ या भागात ही प्रतिबंधित क्षेत्राची संख्या जास्त असल्याने अर्ध्या नवी मुंबईत स्थानिक टाळेबंदी कायम आहे. प्रतिजन आणि स्व्ॉब तपासण्यांची संख्या वाढवण्यात आली असून दिवसाला दोन ते अडीच हजार तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे शहरात करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. वाढलेली ही संख्या पुढील महिन्यात ओसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या देखील वाढणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ४२ प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करताना १०० मीटरचा परिसराची मर्यादा घालण्यात आली होती. त्यामुळे दहा हजार रुग्णसंख्या असताना पालिकेला ४२ प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करावी लागलेली आहेत. सध्या रुग्णांची संख्या पंधरा हजाराचा टप्पा गाठणार आहे. त्यामुळे शहरात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आणखी वाढणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्रांत घट?

स्थानिक पातळीवरील टाळेबंदीची मुदत शुक्रवारी ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना आणखी काही काळ घरी सुरक्षित राहावे लागणार आहे. मागील महिन्यात अनेक रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याने रुग्ण सापडलेले क्षेत्रातील प्रतिबंधितचा फलक हटविला जात आहे. त्यामुळे एकीकडे प्रतिबंधित क्षेत्र वाढणार असतानाच दुसरीकडे ते कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्ण सापडल्यानंतर पालिकेचे कर्मचारी त्या क्षेत्रात हिरवा पडदा लावून प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावत असून पोलिस नाकाबंदीची प्रक्रिया पूर्ण करीत आहेत.