दिघ्यातील इलठण पाडा परिसरातील डॅमजवळ सापडलेल्या दोन मृतदेहांचे गूढ उकलण्यात रबाळे एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. प्रेमापोटी मित्रांनेच मित्रांची हत्या करुन त्यांनतर प्रेमाला विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचाही काटा काढल्याचे दुहेरी हत्याकांडातून समोर आले आहे.
दिघा येथील दीपक ऊर्फ सॅम वाल्मीकी याचे मृत शब्बीर अन्सारी याच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. या संबंधांना शब्बीर याचा विरोध होता. दीपक याचा मुंब्रा येथील मित्र सोहेल कुरेशी यालाही या प्रकरणाची माहिती होती. त्या आधारे तो दीपकला ब्लॅकमेलिंग करीत असे. दीपक व त्याच्या प्रेयसीचे मोबाइलवर ध्वनिमुद्रित झालेले संभाषण शब्बीरला ऐकवण्याची धमकी तो दीपकला देत असे. मात्र दीपकने त्याला दाद दिली नाही. सोहेलच्या धमक्या वाढतच गेल्याने दीपकने त्याचा खून केला, तसेच प्रेमाच्या आड येणाऱ्या शब्बीरचाही त्याने काटा काढला. या दुहेरी हत्याकांडाचा सुगावा लागत नसल्याने पोलीसही चक्रावले होते, मात्र सखोल तपासाअंती दीपकला पकडण्यात पोलिसांना यश आले.