20 January 2019

News Flash

निसर्ग हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती!

डॉ. प्रकाश आमटे यांनी यावेळी हेमलकसामधील काही अनुभवांचे कथन केले.

प्रकाश आमटे (संग्रहित छायाचित्र)

डॉ. प्रकाश आमटे यांचे मत; साहित्य संस्कृती, कला मंडळाचा वर्धापनदिन

आजच्या जगात प्रत्येकाने नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन केले पाहिजे. आजच्या युगात तीच श्रेष्ठ संपत्ती आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. शनिवारी वाशी येथे साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त इमारतीतील सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आमटे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. प्रकाश आमटे यांनी यावेळी हेमलकसामधील काही अनुभवांचे कथन केले. लोकबिरादरी प्रकल्पात त्यांनी नैसर्गिक साधनांच्या साहाय्याने विविध समस्यांवर कशी मात केली, याची अनेक उदाहरणे दिली. त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे ३ते ४ वर्षांपूर्वी लोकबिरादरी, हेमलकसा या भागात दुष्काळसदृश स्थिती ओढविली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा अनिकेत याने ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजना राबविली. गेल्या वर्षी त्या विभागात केवळ ३५ मिमी पाऊस पडला. पाणी आडवा पाणी जिरवाअंतर्गत खोदलेल्या तलावात ३५ मिमी पावसाचे पाणी साठवण्यात आले. त्याचा फायदा हा गावातील नागरिकांना झाला. त्यांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला, असे आमटे यांनी सांगितले.

हेमलकसामध्ये आम्ही प्राणी, वृक्ष व गरजू आदिवासींना विकासात सामावून घेतले. आता तीच आमची सर्वात मोठी संपत्ती आहे. आपण निसर्गाला दोष न देता त्याला आपलेसे करून घेतले तर तो संपत्ती ठरू शकतो. निसर्गाला नेहमीच आपला सोबती बनवा, असे आवाहन त्यांनी केले. हेमलकसाला येणारे नागरिक कामापेक्षा प्राणी पाहण्यास अधिक उत्सुक असतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘वीज बचत शक्य!’

मराठी विज्ञान परिषदेचे विश्वस्त प्रभाकर देवधर यांनी सौरऊर्जा वापरावर भाष्य केले. साहित्य मंडळाच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कौतुक करत ही ऊर्जा वापरात आणल्यास आपल्याला वीजनिर्मितीसाठी कोणत्याही इंधनावर अवलंबून राहावे लागणार नाही. सौरऊर्जेचा वापर केल्यास प्रदूषणाला आळा घालता येईल, तसेच वीजटंचाईवर मात करता येईल. देशभरात सध्या सौरऊर्जेचा वापर करून ३०% वीज बचत केली जात आहे. इतरांनी संस्था, सोसायटी पातळीवर सौरऊर्जेचा वापर वाढविल्यास मोठय़ा प्रमाणात वीज बचत करण्यात यश प्राप्त होईल, असेही ते म्हणाले. हे प्रकल्प राबविताना सर्व उपकरणे, इतर व्यवस्थेची खातरजमा करूनच योजना राबवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

First Published on February 13, 2018 2:44 am

Web Title: nature is the best wealth says prakash amte