अफसानाला आठ दिवसांची पोलीस कोठडी

खारघरमधील पूर्वा प्ले ग्रुपमध्ये दहा महिन्यांच्या बालिकेला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेली आरोपी अफसाना शेख हिने आपल्याला तुरूंगात बेदम मारहाण करण्यात आल्याचा दावा न्यायालयात केला. न्यायालयाने अफसानाला आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली.

[jwplayer jPX7MVNf]

बालिका मारहाण प्रकरणी अफसानाला आधी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, तिच्याविरोधात हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवल्यानंतर तिला पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली. या प्रकरणी तिला रविवारी पनवेल येथील प्रथम न्यायदंडाधिकारी जे. एम. चव्हाण यांच्यापुढे हजर करण्यात आले. आपल्याला तुरुंगात दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचा दावा तिने या वेळी केली. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी दिली. आपल्या कृत्याबद्दल अफसानाने पोलिसांकडे पश्चाताप व्यक्त केल्याचेही समजते.

अफसाना ही पाच वर्षांच्या मुलासोबत कोपरा गावात राहते. पोलिसांनी रविवारी या मुलाकडे अफसानाच्या वर्तनाबाबत चौकशी केली. या सर्व प्रकरणामुळे या मुलाचा सांभाळ त्याची मावशी करत आहे.

पालकांकडून मुख्यमंत्र्यांची भेट

पीडित बालिकेच्या पालकांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्याचे समजते.

पाळणाघरांना नोटीस

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या परिसरात पाळणाघर व प्ले ग्रुप किती आहेत याची आकडेवारी गोळा करण्यात येत आहे. तसेच या पाळणाघरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही, व्यवस्थापकांनी तेथील कामगारांचे चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र घेतले की नाही, या आशयाची नोटीस सर्व पाळणाघरांना बजावण्यात आली आहे.

[jwplayer 4Ldgg0db]