अण्णासाहेब मिसाळ यांनी काढलेल्या कामांची देयके अद्याप अपूर्ण

लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

शहरात वाढणारी करोना रुग्णसंख्या नियंत्रणात न आणल्याने एक वर्षांत बदली करण्यात आलेले माजी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना अद्याप शासनाने नवीन जबाबदारी न दिल्याने त्यांनी नेरुळ येथील आयुक्त बंगल्यात तळ कायम ठेवला आहे. या आयुक्तांनी शेवटच्या दिवसांत काढलेली काही कामे आणि कंत्राटदारांचे देयके अद्याप पूर्ण न झाल्याने नवीन आयुक्त अभिजित बांगर यांनी ही सर्व कामे करोनापेक्षा महत्त्वाची नसल्याचे स्पष्ट करून या संचिका ताब्यात घेतल्याचे समजते.

मागील महिन्यात झालेली बदली मिसाळ यांनी स्थगित करण्यात यश मिळविले होते. त्यामुळे अनेक वैद्यकीय आणि नागरी कामांच्या मंजुरींचा बार उडवून देण्यात आला होता. बदलीचे आदेश आल्यानंतर मिळालेल्या २३ दिवसांत मिसाळ यांनी करोनासाठी लागणारी वैद्यकीय साहित्य खरेदी आणि पावसाळी कामे मंजूर केलेली आहेत.

यासाठी कंत्राटदार आणि पुरवठादारांवर झालेल्या ‘अनुग्रहाला’ जागता त्या कामांची देयके मंजूर करण्याची जबाबदारी बदली झालेल्या आयुक्तांवर येऊन ठेपली होती. त्या सर्व संचिकांवर नवीन आयुक्त बांगर यांनी चाप लावला असून नऊ संचिका स्वत:कडे ठेवून घेतल्या आहेत. यात केंद्र सरकारच्या अमृत योजनेतील काही कामे आणि पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे.

शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बांगर यांनी आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर दिला आहे. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाचा आढावा सातत्याने घेतला जात आहे. अशा वेळी नागरी कामांचा बाऊ करून अभियंता विभागाकडून मंजुरीसाठी पुढे करण्यात आलेल्या संचिका आयुक्तांनी पडताळणीसाठी ठेवून घेतलेल्या आहेत.

नवी मुंबईतील करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी अपयश येत असल्याच्या आरोपांवरून जुलैच्या सुरुवातीसच अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर लगेचच ती रद्दही करण्यात आली. मात्र, पुन्हा त्यांची उचलबांगडी करण्यात येऊन अभिजीत बांगर यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

मिसाळ यांचे मुंबईत घर

एक आठवडय़ापूर्वी अण्णासाहेब मिसाळ यांची बदली झाली आहे. त्यांना राज्य शासनाने अद्याप इतरत्र पदभार दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी नेरुळ येथील आयुक्त बंगल्यावरील स्वत:चा निवास कायम ठेवला आहे. या ठिकाणी बसून ते जुन्या कामांच्य् आठवणी उगाळत आहेत मात्र शहरातील करोनाविरोधातील लढा देणाऱ्या नवनियुक्त पालिका आयुक्तांना मुंबईवर ये-जा करावी लागत आहे. नवी मुंबई पालिकेचे माजी आयुक्त मिसाळ यांचे मुंबईत घर आहे.