नगरसेवक अपात्रतेची टांगती तलवार; सेनेची मोर्चेबांधणीस सुरुवात 

दिघ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने राष्ट्रवादीची नगरसेवक संख्या घटणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या महापौर निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा फटका सोसावा लागण्याची शक्यता आहे. या संधीचा फायदा शिवसेनेने घेण्याचे ठरविले असून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले त्या दृष्टीने चाचपणी करीत असून काँग्रेसच्या पाठिंब्यावर पुढील वर्षी पालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. ‘मातोश्री’ने याला हिरवा कंदील दाखविला आहे.

१११ नगरसेवक संख्या असलेल्या नवी मुंबई पालिकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ बहुमताच्या काठावर आहे. त्यामुळे तीन अपक्षाच्या साहाय्याने राष्ट्रवादीचा महापौर पुरस्कृत म्हणून बसविण्यात आला आहे. महापौर निवडणुकीत खबरदारी म्हणून काँग्रेसच्या दहा नगरसेवकांची साथ घेण्यात आली असून या काँग्रेसने राष्ट्रवादीला स्थायी समिती निवडुकीत हिसका दाखविला आहे. राष्ट्रवादीला चीतपट करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचे नंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सभागृहात केवळ दाखविण्यासाठी असलेली काँग्रेस राष्ट्रवादीची कोणत्याही क्षणी साथ सोडून देईल असे वातावरण आहे. शिवसेना भाजपाचे एकूण ४६ नगरसेवक होत असून त्याला काँग्रेसची पांठिबा मिळाल्यास महापौर पदासाठी लागणारा जादुई आकडा पार करता येण्यासारखा असल्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना वाटत आहे. त्यात राष्ट्रवादीचे संख्याबळ नगरसेवकांची अपात्रता सिध्द झाल्यास कमी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना विविध प्रकरणात अपात्र ठरविण्याची एक खेळी राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या साहाय्याने साधली जात आहे.

प्रसंगी नगरसेवकाला महापौर पद

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या ५० च्या खाली आल्यास शिवसेनेला पुढील वर्षी महापौर करण्याची संधी प्राप्त होणार आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले सध्या याच कामात व्यस्त असून तोडफोडीच्या राजकरणाचे ते सूत्रधार आहेत. खासदार-आमदारकीच्या निवडणुकीत दोन वेळा पराजित झाल्याने निदान या शहराचा प्रथम नागरीक होण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. यासाठी स्थायी समिती सभापती पद खिशात घातल्यापासून महापौर पदाची सेनेची अपेक्षा वाढली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत बसलेला नाही. त्यांनी कमी होणारी नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन दुसऱ्या पक्षातील नगरसेवक गळाला लावण्याची  व्यूहरचना आखली गेली असून वेळप्रसंगी त्या नगरसेवकाला महापौर पद देण्याची तयारीही दाखविण्यात आली आहे.