नापिकीमुळेही उरणच्या शेतीवर नवे संकट
तालुक्यातील वाढते औद्योगिकीकरण व समुद्राच्या भरतीमुळे वारंवार शेतीत खारेपाणी शिरल्याने शेती नापिकी होऊ लागली आहे. २०१४ मध्ये भातशेती व भाज्यांच्या पिकाखाली असलेल्या २७०० हेक्टर जमिनीत घट होऊन ती २४६० हेक्टरवर आली आहे. दोन वर्षांत जवळपास ३०० हेक्टरपेक्षा अधिक शेतीखालील जमिनीत घट झाली आहे. तर तालुक्यातील १४ हजार असलेली शेतकरी खातेदारांची संख्या १२ हजार ७०४ वर आली आहे. यामध्ये अनेक महिन्यांपासून भरतीच्या पाण्यामुळेही दोन हजार एकरापेक्षा अधिक जमीन नापिकी झाली आहे.
खोतांच्या आणि जमीनदारांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी कसेल त्याची जमिनीसाठी रायगडमध्ये शेतकरी लढा झाला. या वेळी शेतकऱ्यांनी शेतकरी संप केला. त्यातून राज्यात कुळकायद्याची अंमलबजावणी सुरू झाला. या लढय़ात उरणमधील शेतकरी पुढे होता.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बहुतांशी जमिनी या समुद्रकिनाऱ्यालगत व खाडी परिसरातील आहेत. खारेपाटातील शेती एकपिकी व मान्सूनवर अवलंबून असलेली शेती आहे. शेतीऐवजी नागरीकरण व औद्योगिकीकरणासाठी उरणमधील जमिनींचा वापर होऊ लागला आहे.
शासनाने सिडकोच्या माध्यमातून उरण तालुक्यातील १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन संपादित केली आहे. त्यामुळे पश्चिम विभागात सध्या शेती शिल्लक राहिलेली नाही.

जेएनपीटी बंदरासाठी संपादित केलेल्या जमिनींत शेतकरी पुन्हा भातशेती करीत आहेत. अनेक ठिकाणी आंबा, नारळ तसेच भाजी व फुलांची शेती करून उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
– के. एस. वसावे, तालुका कृषी अधिकारी