कळंबोली येथील सुधागड विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यानं स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा केल्याचा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. वडिलांनी कॉलेजला जाण्यासाठी मोटारसायकल दिली नाही म्हणून त्यानं शाळेतील स्वच्छतागृहात स्वत:ला पेटवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या विद्यार्थांची प्रकृती नाजूक असून ऐरोली येथील बर्न सेंटर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शिवम दीपक यादव असं त्या विद्यार्थाचे नाव आहे. कळंबोली येथील अमरदीप सोसायटीमध्ये तो राहत असून नवीन सुधागड हायस्कुलमध्ये ११ विज्ञान शाखेत शिकत आहे. आज (शुक्रवारी) सकाळी शाळेत जात असताना त्याने शाळेत जाण्यासाठी वडिलांकडे मोटारसायकल मागितली. मात्र, त्याच्या वडिलांनी मोटारसायकल घेऊन जाण्यास मनाई केली. शिवम रागातच कॉलेजमध्ये गेला. त्याचा वर्ग पहिल्या माळ्यावर असतानाही तो दुसऱ्या माळ्यावरील स्वच्छतागृहात गेला. त्यानंतर आतून कडी लावून त्याने स्वतःला पेटवून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

त्याच अवस्थेत तो बाहेर आल्यावर उपस्थित शिक्षकांनी आग विझवली. त्यानंतर त्वरित शिवमला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तो जास्त भाजला असल्यानं नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न सेंटरमध्ये त्याला हलवण्यात आलं. उपचारादरम्यानच त्याने वडिलांनी मोटारसायकल दिली नाही म्हणून रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली दिली. त्याने पेटवून घेण्यासाठी काय वापरलं, तसंच अन्य बाबींचाही तपास सुरू आहे, अशी माहिती कलंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली.