फूडलॅण्ड ते पडघे गावापर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण
तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी नावडे फाटा येथील उड्डाणपूल हा एकमेव मार्ग वाहनांसाठी खुला असताना सिडको प्रशासनाने रोडपाली येथील फूडलॅण्ड ते पडघे गावापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.
या उड्डाणपुलावरील प्रवास सुरू झाल्यास नावडे फाटा ते रोडपाली जंक्शन वाहतूक कोंडीतून सामान्यांची सुटका होणार आहे. रोडपाली येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून सिडकोने रेल्वे प्रशासनाकडे या पुलाच्या बांधकामाची तपासणी करून हा पूल वापरण्याची परवानगी मागितली आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेच्या विकासाला चालना देणारा नवीन उड्डाणपूल येत्या महिन्याभरात सुरू होईल अशी अपेक्षा प्रशासकीय स्तरावर व्यक्त केली जात आहे.
औद्योगिक वसाहतीमधील पडघे गावानजीक रासायनिक क्षेत्र जाहीर केलेल्या कारखान्यांजवळ दिवा-पनवेल लोहमार्गावर अजून एक उड्डाणपूल असावा अशी मागणी कारखानदारांनी केली होती. तळोजा कारखानदारांचे नेतृत्व करणाऱ्या तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनने (टीएमए) याबाबल लेखी निवेदने दिली होती. याच मार्गावर विशेष आर्थिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रालाही या पुलाचा लाभ होणार होता. सिडकोने लोखंड बाजार ते विशेष आर्थिक क्षेत्र आणि तळोजा औद्योगिक क्षेत्र जोडण्यासाठी रोडपाली येथील फूडलॅण्ड कंपनीसमोर हा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. या पुलाचा सर्वाधिक लाभ तळोजा औद्योगिक क्षेत्राला होणार आहे. तसेच नावडे फाटय़ावर रोजची वाहतूक कोंडीही फुटणार आहे.

भूसंपादनापूर्वी रस्त्याचे काम केल्याने मार्गाचे काम थांबले
तळोजा औद्योगिक क्षेत्राला पूर्णपणे जोडण्यासाठी रिंगरोड बांधण्याचे काम टेक्नोवा ते वीज उपकेंद्र या मार्गाचे काम सुरू होते. औद्योगिक विकास महामंडळाने ७८० मीटरचा चौपदरीकरण असलेला काँक्रीटचा रस्ता बांधण्याचे काम सुरू केले. वर्षभरापासून या मार्गावर मातीचा भराव घालून त्यावर काँक्रीटीकरणाचे काम सुरूही झाले. मात्र या रस्त्यादरम्यानची जागा सिडको प्रशासनाने हस्तांतरण केली नसल्याचे औद्योगिक विकास मंडळाच्या लक्षात आले. संबंधित शेतकऱ्यांनीही विरोध केल्यानंतर हे काम थांबले आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे.