महापौर निवडणुकीत शिवसेनेला साथ न देण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याने ही निवडणूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. पण या निवडीनंतर होणारी उपमहापौर निवडणूक मात्र चुरशीची ठरणार आहे. उपमहापौर निवडणुकीसाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांची पत्नी नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना मतदान करण्याचा व्हिप काढण्यात आला आहे. याच पक्षाचे स्थानिक अध्यक्ष दशरथ भगत यांनी म्हात्रे यांच्या उमेदवारीविरोधात दंड थोपटले असून त्यांनी आपल्या पत्नीची उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे भगत यांनी माघार न घेतल्यास महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याची वाट पाहणाऱ्या काँग्रेसच्या १० नगरसेवकांमध्ये फूट अटळ आहे.

नवी मुंबईच्या १३ व्या महापौर-उपमहापौरांची निवड गुरुवारी होणार आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी महापौर निवडणूक लढविण्याची तयारी दोन महिन्यांपासून केल्याने या निवडणुकीत रंगत आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची पालिकेतील सत्ता ही काँग्रेस व अपक्षांच्या टेकूवर टिकलेली आहे. त्यामुळे हा टेकू काढण्याचे काम शिवसेनेने गेले दोन महिने सुरू ठेवले होते. याच वेळी शिवसेनेने भाजपाच्या सहा नगरसेवकांना गृहीत धरल्याने त्यांच्या पाठिंब्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली नाही. राज्यात सुरू झालेल्या शिवसेना-भाजपा यादवीचा फटका चौगुले यांच्या उमेदवारीला बसला. त्यामुळे शिवसेनेचे पालिकेत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंगले आहे.

चौगुले यांना तर रात्री उशिरा वर्षांवर बोलवून उमेदवारी अर्ज न भरण्याचे आदेश देण्यात आले. साधा उमेदवारी अर्ज भरण्याचे स्वातंत्र्य भाजपाने चौगुले यांना दिले नाही. शिवसेनेच्या उमेदवाराला अर्ज न भरण्याचे आदेश भाजपाच्या नेत्यांनी दिले हे या निवडणुकीतील दुसरे वैशिष्टय़ आहे. यामुळे चौगुले यांना आपल्या तंबूत घेऊन भाजपाने शासकीय पदाचे आमिष दाखविल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीच्या शिडातील हवा निघून गेली आहे. उपमहापौरपदासाठी (पान ३वर)

भगत यांच्या गटात सहा नगरसेवक

राष्ट्रवादीमध्ये फुटीची बीजे पेरणाऱ्या काँग्रेसमध्येच फूट पडली आहे. भगत यांच्या गटात सहा नगरसेवक आहेत तर म्हात्रे यांच्या पारडय़ात चार नगरसेवकांची मते आहेत. त्यामुळे भगत यांनी माघार न घेतल्यास काँग्रेसमधील फूट अटळ आहे.