‘बेस्ट’चे अनुकरण केल्यास दिवसाला तोटा दहा लाखांवर

संतोष जाधव,

‘बेस्ट’ तिकीट दरकपातीमुळे आधीच तोटय़ात सुरू असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रम आर्थिक कोंडीत सापडला आहे. प्रवासी ‘बेस्ट’कडे वळाल्याने दिवसाला तीन लाखांचा गल्ला कमी मिळत आहे. जर ‘बेस्ट’प्रमाणे तिकीटदर कमी केले तर हा तोटा दिवसाला दहा लाखांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे करावे तर काय? असा पेच ‘एनएमएम’टी प्रशासनासमोर आहे.

‘बेस्ट’ ने ९ जुलैपासून त्यांचे तिकीटदर कमी केले. यामुळे ‘बेस्ट’चे प्रवासी वाढले मात्र उत्पन्नात वाढ झाली नाही. मात्र या निर्णयाचा नवी मुंबई महापालिकेच्या ‘एनएमएमटी’ बस सेवेवर परिणाम दिसू लागला. दिवसाला २० ते २५ हजार प्रवासी कमी झाले. महिनाभरात सुमारे १ ते दीड कोटींचा आर्थिक फटका बसला आहे. पासधारकांची संख्याही घटली आहे.

‘एनएमएमटी’चे बेस्टकडे गेलेले प्रवासी पुन्हा ‘एनएमएमटी’कडे खेचण्यासाठी तिकीट दरकपात हा पर्याय जर ‘एनएमएमटी’ने स्वीकारला तर हा तोटा भरून न निघता यात वाढ होण्याची शक्यता आहे. ‘एनएमएमटी’ने जर ‘बेस्ट’प्रमाणे पहिल्या ५ किलोमीटरला ५ रुपये तिकीटदर आकारण्याचा निर्णय घेतला तर हा तोटा दिवसाला १० लाखावर व महिन्याला तीन कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने तिकीटदर कपातीबाबतचा निर्णय घेताना सारासार विचार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा सावरण्याच्या नादात उपक्रम कोलमडण्याची स्थिती निर्माण होऊ  शकते.

नवी मुंबई महापालिका हद्दीतून ‘बेस्ट’ला चांगले उत्पन्न मिळत असल्याची माहिती ‘बेस्ट’ने दिली आहे. परंतु पालिकेची आहे ती सेवा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. ‘बेस्ट’चे व ‘एनएमएमटी’चे तिकिटाचे टप्पे यात मोठा फरक असल्याने अभ्यासाअंती निर्णय घेण्याची गरज असल्याचे अनेकांचे मत आहे.

‘एनएमएमटी’ प्रशासनाला या स्पर्धेत टिकायचे असेल तर सक्षम उपाययोजना कराव्याच लागतील. सर्वसमावेशक धोरण निश्चित करायला हवे, असे परिवहन सदस्य समीर बागवान यांनी सांगितले. तर एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी आम्ही सावध पवित्रा घेतला असून तिकीट दर कपातीबाबत योग्य वेळी सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.