सोमवारपासून रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार

वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील पेच सुटण्याची चिन्हे असून सोमवारपासून रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. राजीनामा दिलेले दोन्ही डॉक्टर आणखी एक महिना काम करणार आहेत. अन्य पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

विकी इंगळे मृत्यूप्रकरणी आयुक्तांनी दोन डॉक्टरांना निलंबित केले होते. त्यांच्या समर्थनार्थ आणखी दोन डॉक्टरांनी राजनामे दिले. सात मेडिसिन डॉक्टरांनी अघोषित असहकार स्वीकारला. त्यातच प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे रजेवर गेल्याने रुग्णालयातील सेवेचा बोजवारा उडाला होता. गुरुवारीही हीच परिस्थिती कायम राहिली. बाह्य़रुग्ण विभागातही नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती. अपवाद वगळता पूर्ण रुग्णालय प्रशिक्षणार्थी डॉक्टर चालवत होते. फारशी वर्दळ नसल्याने सुरक्षा रक्षक व कामगार निवांत बसले होते.

आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेत असहकार पुकारणारे डॉक्टर आणि राजीनामा दिलेल्या डॉक्टरांशी चर्चा केली. आयुक्तांच्या समोर डॉक्टरांनीही आपल्या व्यथा मांडल्या. आयुक्तांनी सर्वाची बाजू ऐकून घेतली. गुरुवारीही याच विषयावर निवासी डॉक्टरां समवेत बैठक पार पडली.

सध्या अन्य रुग्णालयांतील काही डॉक्टर आणि पालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयातील काही डॉक्टर काम करत आहेत. शुक्रवारपासून सर्व सेवा सुरळीत होतील. राजीनामे दिलेले डॉक्टर एक महिना कार्यरत राहतील. भरती लवकरच करण्यात येईल. सोमवारपासून रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून डॉक्टरांअभावी बंद पडलेले कक्षही सुरू केले जातील.

– डॉ. रामस्वामी एन.,आयुक्त, नमुंमपा