तळोजा परिसरातील स्थिती

पनवेलमधील औद्योगिक वसाहतींत रात्री पायी जाणाऱ्या कामगारांना लुटणाऱ्यांची टोळी गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. एका टोळीवर कारवाई केली की दुसरी टोळी सक्रिय होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. गेल्या दोन वर्षांत तळोजा औद्योगिक वसाहतीत पादचाऱ्यांना लुटण्याच्या २० घटना घडल्या आहेत. सर्व प्रकरणांतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, तरीही चोऱ्या मात्र थांबलेल्या नाहीत. तळोजा पोलीस ठाण्यावर ९०० कारखाने, २८ गावे व तळोजा आणि नावडे वसाहतीतील रहिवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. दोन हजार व्यक्तींमागे एक पोलीस अशी पनवेलच्या औद्योगिक वसाहतींतील स्थिती आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीत २०१८च्या पहिल्या दोन महिन्यांत दोन चोऱ्यांची नोंद झाली आहे, या प्रकरणांत मात्र एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी पोलिसांनी औद्योगिक विकास महामंडळ व पनवेल पालिकेकडे केली आहे. त्यामुळे किमान चोरटय़ांचे वर्णन आणि वाहनांचा क्रमांक टिपणे शक्य होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. तब्बल ९०० कारखाने असलेल्या क्षेत्रात या साध्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. तीन वर्षांपासून पोलिसांना गस्तीसाठी वाहन कमी पडत असल्याने उद्योजकांनी लोकवर्गणी काढून पोलीस ठाण्याला नवीन वाहन घेऊन दिले. त्यानंतर गस्तीचे प्रमाण वाढेल आणि चोऱ्या कमी होतील, अशी अपेक्षा होती, मात्र घोट, नितळस, देवीचा पाडा, पडघे या ठिकाणी आजही रस्त्यांवर कामगारांची लुटमार सुरूच आहे.

आनंद सावंत गेल्या आठवडय़ात बॉम्बे ब्रुअरीज कंपनीसमोर मोबाइल फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या दुकलीने त्यांचा फोन हिसकावून पळ काढला. जिथे वारंवार चोऱ्या होतात अशा ठिकाणांची पोलीस ठाण्यात नोंद आहे, मात्र तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावणे किंवा पोलीस चौकी उभारणे अशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. नितळस फाटा येथील पोलीस चौकी कर्मचारी नसल्याने कायम बंद असते. दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटण्याच्या दोन घटना नुकत्याच तळोजा येथे घडल्या आहेत.

कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील बेकायदा थांबा, तळोजा गाव ते रोहिंजण गावासमोरील रस्ता, उरण जेएनपीटीवरून पनवेलकडे येणारा मार्ग येथे अशा घटना घडतात. लिफ्ट देण्याच्या बहाण्याप्रमाणे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांतील डिझेल चोरणारी टोळी औद्योगिक क्षेत्रात सक्रिय आहे.

कळंबोली येथील लोखंड बाजार व तळोजा औद्योगिक क्षेत्रात रात्री अवजड वाहनचालक रस्त्याकडेला वाहन उभे करून झोपतात. अशा वेळी चारचाकी वाहनातून येऊन अवजड वाहनांतील डिझेल चोरल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. नेरूळ येथील दोन विविध टोळ्यांना गेल्या दोन वर्षांत तळोजा येथे अटक करण्यात आली होती. या दोनही टोळ्यांनी नेरूळ, कळंबोलीतही डिझेल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. अवजड वाहनचालकांनी प्रतिकार केल्यावर त्यांना चाकूने दुखापत करणारी टोळीही कार्यरत आहे. नेरूळ येथील याच डिझेल चोरांच्या टोळीने एपीएमसी मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी प्रतिकार केल्यानंतर गोळीबार केला होता.

शहरात गेल्या वर्षी पादचाऱ्यांना लुटण्याच्या ११ घटना घडल्या त्यापैकी सहा घटनांची उकल झाली. खारघरमध्ये गेल्या वर्षी १५ पादचाऱ्यांना लुटण्यात आले, त्यापैकी १० प्रकरणांत आरोपी सापडले. तालुक्यात लुटण्याच्या ४७ घटना घडल्या त्यापैकी ३४ घटनांची उकल झाली.

चोरांचे अड्डे

तळोजा, नितळस फाटा, आयजीपीएल कंपनीच्या मागील रस्ता, घोट गावासमोरून हायकल कंपनीकडे जाणारा मार्ग, देवीचा पाडा ते दीपक फर्टिलायझर कंपनी समोरील मार्ग, पेणधर गावासमोरील मार्ग, केमिकल झोन, पडघे गावाकडून रोडपाली उड्डाणपुलावर जाणारा मार्ग, मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील बेकायदा थांबा, तळोजा गाव ते रोहिंजण गावासमोरील रस्ता, उरण जेएनपीटीवरून पनवेलकडे येणारा मार्ग

विद्यार्थिनीची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न

बारावीच्या परीक्षेला चाललेल्या विद्यार्थिनीची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न पनवेल शहरातील विठ्ठल खंडप्पा विद्यालयाच्या परिसरात बुधवारी झाला.  अंजली फडके असे तिचे नाव आहे. तिने साखळी पकडून ठेवल्यामुळे चोराचा डाव फसला, मात्र तिला गंभीर दुखापत झाली व परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनी तिला परीक्षा देण्यास परवानगी दिली.