‘अंगोरी’ गटाचा संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय

आठवडा बाजारातून शेतीमाल शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत पोहचवत आहेत. यातून त्यांना योग्य भाव मिळत असला तरी मुंबईमध्ये येण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे आठवडा बाजारातील काही शेतकरी गटांनी ऑनलाइन भाजीविक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. नाशिक येथील अंगोरी या गटाने संकेतस्थळ सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

२० शेतकऱ्यांना एकत्र आणून हा गट येऊन तयार करण्यात आला आहे. यात २० शेतकऱ्यांच्या शेतातील माल एकत्र करून विक्रीसाठी आणला जातो. मात्र गाडी भाडे, टोल यामुळे नफा मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या भाज्या घरोघरी पोहोचवण्याचा निर्णय नाशिक येथील अंगोरी गटाने घेतला आहे. हा गट घरपोच ताजी भाजी देणार असल्याचे गटाचे अध्यक्ष सुधेश ढिकले यांनी सांगितले. ही योजना सुरू करण्यासाठी आम्हाला निदान रोज किमान १००० ग्राहक मिळवणे गरजेचे आहे. ग्राहकांनी त्यांच्या मागणीनुसार आदल्या दिवशी ऑर्डर द्यावी आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक भाजी नीट पॅक करून घरपोच मिळेल. सर्व भाजीपाला हा अस्सल देशी आणि तेवढाच ताजा असेल, अशी हमी देणार असल्याचे या गटाचे सदस्य सांगतात.

आम्ही आठवडा बाजारात भाजी विक्रीसाठी येतो. तिथे आमच्या मालाला योग्य भाव मिळत असला तरी, हा व्यापार करताना आम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. मुंबईला येईपर्यंत होणारा खर्च पाहता विक्रीनंतर हातात काहीच उरत नाही. त्यामुळे आम्ही ऑनलाइन भाजीविक्री सुरू करणार आहोत.

सुधेश ढिकले, अध्यक्ष, अंगोरी गट