दहाही सिग्नलवर सीसीटीव्ही असतानाही सर्वाधिक नियमांची पायमल्ली

शहरातील सर्वात मोठा व वर्दळीच्या पामबीच मार्गावर प्रत्येक सिग्नलवर सीसीटीव्ही आहेत. मात्र सर्वाधिक नियमांची पायमल्ली याच मार्गावर दिसून येते. जानेवारीपासून या मार्गावर १२ प्राणांतिकअपघात झाले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

‘ई चालान’ची सर्वाधिक कारवाई या मार्गावरच केली असली तरी वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे प्रमाण पाहता या यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. माहिती असतानाही बेदरकार गाडी चालवणे, लेन कटिंग करणे आणि सर्रास सिग्नल तोडले जात आहेत. याच मार्गावर सानपाडा मोराज सर्कल व बेलापूर किल्ले गावठाण चौक वगळता कोणत्याही ठिकाणी वाहतूक पोलीस कर्तव्यावर असल्याचे दिसत नाही.   किल्ले गावठाण ते वाशी अरेंजा कॉर्नपर्यंत पामबीच मार्गाची लांबी ९ किलोमीटर असून ताशी ६० किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची परवानगी आहे.

* यावर मर्यादा ठेवण्यासाठी  १० ट्राफिक सिग्नल आहेत. किल्ले गावठाण चौक, नेरुळ सेक्टर ५० येथील चौक, एनआरआय चौक, सीवूड्स अक्षर चौक, करावे चाणक्य चौक, वजरानी चौक, सारसोळे जेट्टी चौक, सानपाडा मोराज सर्कल चौक, वाशी सिटी बँक चौक, अरेंजा कॉर्नर चौक. या प्रत्येक सिग्नलवर पाहणी केली असता वाहतूक नियमांची पदोपदी पायमल्ली केली जात असल्याचे दिसते. याच मार्गावरील सिग्नल तोडल्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त आहे.