पनवेल पालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत गदारोळाची शक्यता

पनवेल महापालिकेच्या शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगरसेवक पालिका आयुक्तांना लक्ष्य करणार असल्याची चर्चा शुक्रवारी पालिकेत रंगली होती. पाणीकपातीचा निर्णय जाहीर करताना प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, आकृतिबंध महासभेसमोर आणण्यास विलंब झाला तसेच प्रभाग समित्यांवरील नेमणुका रखडल्याच्या मुद्दय़ांवरून आयुक्तांवर शरसंधान केले जाणार असल्याचे समजते. यापूर्वीही शिंदे यांच्या बदलीसाठी भाजपकडून मंत्रालयात प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त होते. त्यामुळे आयुक्तांची बदली रोखण्यासाठी रहिवाशांनी स्वाक्षरी मोहिमा राबवल्या होत्या.

पनवेल शहराचा पाणी प्रश्न मिटावा अशी पनवेलकरांची अपेक्षा आहे. दर उन्हाळ्यातील टँकर प्रतीक्षा कधी संपणार, याची वाट पनवेलकर पाहात आहेत. पालिका स्थापन होऊन १७ महिने उलटले तरीही पाणी प्रश्न सुटण्याऐवजी बिकट होत असल्याने नागरिक प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत. गेल्या वर्षी उन्हाळ्यात पनवेलकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पनवेलकरांना पुन्हा पाणीबाणीला तोंड द्यावे लागेल.

शनिवारी आकृतिबंधावर चर्चा होणार आहे. अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी न केल्याने आकृतिबंध मंजूर होण्यास विलंब होत असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी केला होता. याविषयी पालिकेतील सत्ताधारी जाब विचारणार असल्याचे कळते. आयुक्तांचा कारभार संथ असल्याची टीका करत आकृतिबंध लवकर मंजूर करण्याच्या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांनी मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.