मलेरिया, डेंग्यूच्या डासांच्या निर्मूलनासाठी पनवेल नगरपालिकेने गेल्या तीन वर्षांतील जंतुनाशक औषधांची खरेदी आणि फवारणीसाठी तब्बल सहापटींने वाढ केली. यासाठी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०१६-१७चा अर्थसंकल्प मंगळवारी सर्वसाधारण बैठकीत सभागृहासमोर सादर झाला. १५४ कोटी रुपयांच्या वार्षिक अर्थसंकल्पात सामान्यांसाठी कोणतीही करवाढ केली नसल्याचा दावा मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी केला आहे. तरीही निवासी वापराच्या नावाखाली अनेक वर्षांपासून व्यावसायिक वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढल्याने पनवेलच्या मालमत्ताधारकांची संख्या ४२ हजारांवर पोहोचली. त्यामुळे मागील वर्षी सुमारे शंभर कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाची आकडेवारी ५४ कोटींनी वाढविण्यात आली आहे. अर्थसंकल्पाच्या या बैठकीत नगराध्यक्ष चारुशीला घरत यांनी पनवेलमध्ये यापुढे जन्माला येणाऱ्या मुलींचे जन्मदाखले मोफत देण्यात येतील, अशी घोषणा केली. दोन कोटी दोन लाख सात हजार दोनशे रुपयांचा शिलकी असल्याचे जाहीर करण्यात आले.
उत्तरासाठी ‘पगडे’च..
नगरपालिकेत सदस्यांच्या अनेक बैठकी होतात. कोणतीही बैठक असो वा विरोधी बाकांवरील सदस्यांनी कोणत्याही समस्या मांडो, त्यांना प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळत नाही. विशेष म्हणजे लतिफ शेख व डॉ. सुरेखा मोहोकर यांनी अनेकदा प्रशासन ढिम्म असल्याची जाहीर तक्रार केली. तरीही परिस्थिती जैसे थे, अशी केविलवाणी अवस्था पनवेल नगरपालिकेत सदस्यांची झालेली आहे. तसेच विरोधकांनी बैठकांमध्ये अनेकदा कोणत्याही समस्येबाबत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी किंवा प्रशासनामधील अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यावर त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हिरिरीने सत्तारूढांच्या बाकांवर बसलेले सदस्य जयंत पगडे सभागृहाला उत्तर देऊन वेळ मारून नेतात.

* पाणीपुरवठय़ाच्या पंपांसाठी दोन कोटी रुपये
* महामार्गावरील सिग्नल यंत्रणेसाठी २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित
* नगरपालिका विद्यालयांमध्ये शिकणाऱ्या २,५५२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटपासाठी २१ लाखांची तरतूद
* पथदिव्यांसाठी नव्याने ७५ लाख, तर मोकाट जनावरे आणि श्वान निर्बीजीकरणासाठी १० लाख रुपये
* फडके नाटय़गृहासाठी दोन कोटी ४० लाख रुपयांची तरतूद
* आरोग्यासाठी एकूण १० कोटींची तरतूद
* वडाळे, कृष्णाळे, देवाळे या तलावांच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद
* मासळी बाजारासाठी एक कोटी २५ लाख