रायगड किनाऱ्यावरील उरण ते पनवेल या तालुक्यातून नाशिक जिल्ह्याकडे निसर्ग चक्रीवादळ जाणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने उरणमधील कोप्रोली, दिघोडे, गव्हाण आणि पनवेलमधील पनवेल शहर आणि नेरे या गावांच्या परिसराला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

पनवेलमधील सखल भागातील ५५ कुटुंबांना स्थलांतरीत केले असून दुपारी साडेबारा वाजल्यापासून ते अडीच वाजेपर्यंत कोणीही घरातून बाहेर जाऊ नये असे प्रशासनाने आदेश बजावले आहेत. पनवेलचे प्रांतधिकारी दत्तात्रय नवले यांनी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ते चक्रीवादळ पनवेलमधून निघून जाईपर्यंत वीज यंत्रणेला खंडीत कऱण्याचे आदेश दिले आहेत.

मोडकळीस आलेल्या घरांमध्ये आणि धोकादायक घरांमध्ये नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कितीही महत्वाचे काम असले तरी घराबाहेर पडू नये असे प्रांतधिकारी नवले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून समुद्राला असणाऱ्या भरतीमुळे आणि सकाळपासून सतत सूरु असणाऱया पावसामुळे काही ठिकाणी पनवेलमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या.