विमानतळाची कामे न दिल्याने असंतोष

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात असलेल्या पारगावातील हजारो प्रकल्पग्रस्त मंगळवारी रस्त्यावर उतरले. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. पारगावातील एकाही प्रकल्पग्रस्ताला भरावाची कामे दिलेली नाहीत आणि इतर ठिकाणी भराव टाकला जात असल्याने पारगाव गावाच्या आजूबाजूला भरतीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. या गावात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याबाबत सिडको कोणतीही उपाययोजना करत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त केली, मात्र त्यांना गावाच्या हद्दीबाहेर जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात १० गावे विस्थापित होत आहेत. त्यांचे वडघर, दापोली, वहाळ या गावांशेजारी पुनर्वसन होणार आहे मात्र याच भागातील पारगाव, डुंगी, ओवळे, दोपोली, आणि भंगारपाडा ही गावे स्थलांतरित होणार नाहीत. या विस्थापित न होणाऱ्या गावांचीही जमीन सिडकोने संपादित केल्याने त्यांना पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या सोसायटय़ा तयार करून ५० टक्क कामे दिली जातील, असे चार वर्षांपूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे, मात्र सिडकोने डुंगी गावातील चार सोसायटय़ांना कामे दिली असून पारगावला दुर्लक्षित ठेवले आहे. त्यामुळे या गावातील प्रकल्पग्रस्तांची नाराजी वाढली आहे.

दोन बाजूंनी खाडीपात्र असलेल्या या गावात अलीकडे भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढू लागली आहे. आजूबाजूच्या गावांत भराव टाकला जाऊ लागल्याने भरतीचे पाणी या गावाशेजारी जास्त प्रमाणात येऊ लागले आहे. त्यामुळे गावाला पुराचा धोका आहे, असा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे. सिडकोने यासाठी एका खासगी संस्थेकडून सर्वेक्षण करून घेतले आहे, पण त्याचा अहवाल अद्याप प्रसिद्ध न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. मंगळवारी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी पारगावाच्या वेशीवर अडवले. त्यांनी मोच्र्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. आमच्या शेतात आम्हाला उभे राहण्यास तुम्ही कशी बंदी घालू शकता, असा सवाल ग्रामस्थांनी केला. मागण्या पूर्ण न झाल्यास परिणामांची जबाबदारी सिडकोवर राहील, असे पोलीस, कंत्राटदाराला दिलेल्या निवेदनात, नमूद केले आहे.

सोमवारी रात्री उशिरा बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पारगावाचा एक भाग असलेल्या कोल्ही गावात लक्ष्मी नारायण देवस्थानाचा सप्ताह असल्याने या गावातील प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनात भाग घेऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची संख्या काही प्रमाणात कमी झाली.

विमानतळपूर्व कामांपैकी कोणतेही काम बंद झालेले नाही. पारगाव गाभा क्षेत्रात नाही. पूरसदृश स्थिती निर्माण होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. सीओईएफ (पुणे) अथवा आयआयटी पवईची मदत घेतली जाईल. त्यांची पुनर्वसनाची मागणी पूर्ण करण्यायोग्य नाही.

– भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

ठरल्याप्रमाणे सिडकोने प्रकल्पग्रस्तांना कामे वाटून देण्यासाठी मध्यस्थी करणे गरजेचे आहे. डुंगीतील चार सोसायटय़ांना कामे दिली जातात आणि पारगावाला वाळीत टाकले जाते, हे योग्य नाही. याच गावाला पुराचा संभाव्य धोका आहे पण सिडको त्यासाठी काहीच करत नाही. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावरुन उतरून कामे बंद केली. सिडकोने योग्य भूमिका न घेतल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.

– सदाशिव पाटील, पंच, पारगाव समिती