दास्तान ते रांजणपाडा दरम्यानच्या जागेत मातीचा भराव करण्यात येत असून त्यासाठी सोमवारी कामाची निविदा जाहीर करण्यात येत असताना ग्रामस्थांनी जेएनपीटी प्रशासन कार्यालयासमोर जमून भरावाची निविदा रद्द करण्याची मागणी केली. या वेळी जासई, रांजणपाडा, एकटघर आणि सुरुंगपाडय़ातील ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ संघर्ष समितीने प्रथम जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्केच्या भूखंडाच्या इरादापत्राचे वाटप करावे. त्यानंतरच भरावाचे काम करावे, अशी मागणी करणारे निवेदनही जेएनपीटी अध्यक्षांना दिले आहे.
फुंडे परिसरातील खाडी किनाऱ्यावरील जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षित केलेली जमीन सागरी नियमन पट्टय़ात(सीआरझेड) येते. त्यामुळे जमिनीच्या वाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात सीआरझेड समितीकडे ही जमीन वगळण्याची मागणी करण्यात आलेली आहे. असे असले तरी जेएनपीटीकडून पर्यायी जागा म्हणून दास्तान ते रांजणपाडा दरम्यानच्या जमिनीवर मातीचा भराव करून ती विकसित करण्यात येत आहे. त्याकरिता जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा सोमवारी जाहीर होणार होती; परंतु चार गावांतील नागरिकांनी जेएनपीटी प्रशासन भवनासमोर आपला विरोध दर्शविला. या वेळी ग्रामस्थ संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, जासईचे सरपंच अनंत पाटील, विकास नाईक, धर्मा पाटील, अतुल पाटील हे उपस्थित होते.