नवी मुंबई : सानपाडा येथील एका प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचा भूखंड सिडकोतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने खोटी कागदपत्रे सादर करून हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराची स्थानिक पोलीस तक्रार घेत नसल्याने बेलापूर न्यायालयाने तातडीने पोलीस तक्रार दाखल करून अहवाल देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर ही तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली आहे.

खोटी कागदपत्रे सादर करून सिडकोतून साडेबारा टक्के योजनेतील अनेक भूखंड हडप करण्यात आलेले आहे. हे प्रकरण वारसांच्या हक्कामुळे ऐरणीवर आले आहे. या प्रकल्पग्रस्तांचा कोपरखैरणे सेक्टर ११ मध्ये भूखंड अदा करण्यात आलेला आहे.

मृत्यू पावलेल्या प्रकल्पग्रस्तांची खोटे दस्तावेज तयार करून साडेबारा टक्के योजनेतील भूखंड हडप करण्याचे अनेक प्रकार सिडको घडलेले आहेत. सिडकोच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे दस्तावेज तयार करून कोट्यवधी किमतीचे भूखंड लाटण्यात आले असून याबद्दल कमी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत. लाटलेले हे भूखंड तात्काळ मोठ्या विकासकांना विकले जात असल्याने पोलिसांची या विकासकांकडून बोलती बंद केली जात असल्याचा अनुभव आहे. सानपाडा येथील तुषार वास्कर या तरुणाचे दिवगंत नातेवाईक बारीक बाळा पाटील व सुधाकर हिरा वास्कर यांच्या हक्काचा भूखंड दिलीप पाटील यांनी सिडको अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोपरखैरणे सेक्टर ११ येथील भूखंड क्रमांक २६ हा ४९९ चौरस मीटरचा घेतला आहे. त्यानंतर हा भूखंड एका खासगी विकासकाला विकला असून त्या ठिकाणी आता इमारत उभी राहिली आहे.

या सर्व कट-कारस्थानात विकासकाचे चार भागीदार, सानपाडा गावातील जगदीश पाटील, नेरुळ मधील नरेंद्र म्हात्रे आणि इतर पाच जण अशा १२ जणांच्या विरोधात बेलापूर न्यायालयाच्या आदेशाने बेलापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

त्यापूर्वी प्रकल्पग्रस्ताशी समझोता करण्याचा या आरोपींनी प्रयत्न केला असल्याचे फिर्यादी वास्कर यांनी सांगितले आहे. हडप करण्यात आलेल्या या भूखंडाची आजची बाजारभाव किंमत सात ते आठ कोटी रुपये आहे.