मुख्यमंत्र्यांच्या प्रति आवाहनामुळे प्रकल्पग्रस्त संतप्त

नवी मुंबई : पोलिसांची परवानगी नसताना नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्यासाठी गुरुवारी सिडकोला घेराव घालण्यावर प्रकल्पग्रस्त ठाम आहेत. याला प्रतिकार करण्यासाठी शिवसैनिकही आमनेसामने येतील, असा इशारा मुख्यामंत्र्यांनी दिल्याने विमानतळ नामकरण वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उडी घेताना हे विमानतळ मुंबई विमानतळाचा विस्तारित भाग असल्याने त्याला छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे नाव कायम राहणे योग्य होईल, असे मत मांडले आहे. त्यामुळे हा नामकरण वाद दिवसेंदिवस चिघळू लागला आहे.

नवी मुंबई विमानतळाची उभारणी सध्या सुरू आहे. विमानतळपूर्व कामे सिडकोने पूर्ण केलेली आहेत. याच वेळी एप्रिल महिन्यात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्र देऊन या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. सिडकोच्या प्रमुखांनी तसा ठराव करून तो शासनाकडे पाठवला. त्यानंतर स्थानिक भूमिपुत्रांनी लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी करीत मानवी साखळी आंदोलन केले. त्याअगोदर या कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एक बैठक घेतली. त्या वेळी मुख्यमंत्री ठाकरे नामकरणावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर या कृती समितीने साखळी आंदोलन शांततेत केले. या आंदोलनासाठी लागणारी रसद ही भाजपकडून पुरवली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यानंतरही राज्य शासन ‘दिबां’च्या नावासंदर्भात कोणतीच हालचाल करीत नसल्याने २४ जून रोजी एक लाख प्रकल्पग्रस्तांचा घेराव सिडकोला घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत.

या घेराव आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर रविवारी पुन्हा एक बैठक सर्वपक्षीय कृती समितीने आयोजित केली होती. वर्षावर झालेल्या या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, गणपत गायकवाड, महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तुम्ही घेराव आंदोलन करणार आहात त्याला उत्तर देण्यासाठी शिवसैनिकही मैदानात उतरतील, असा इशारा दिला. त्यामुळे शिष्टमंडळातील नेते संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या चिथावणीखोर इशाऱ्यामुळे नामकरणाचा हा वाद आता अधिक चिघळणार असे स्पष्ट दिसून येत आहे.

गुरुवारच्या आंदोलनावर सर्वपक्षीय कार्यकर्ते ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी तुम्ही आंदोलन करणार असाल तर शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, अशी धमकी दिली आहे. हा दिबांच्या कार्याचा अपमान आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरणार आहे. पोलिसांच्या आडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे; पण जनता यावर ठाम आहे. – प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल</strong>

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबा’ पाटील यांच्या नावाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे कृती समितीने पुन्हा एकदा स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितले. यावरून त्यांचा संताप झाला आणि ते बैठकीतून निघून गेले. हे योग्य नाही. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून लोकभावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. सरकारने या वादाचा गांभीर्याने विचार करावा. – दशरथ पाटील, अध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती