खारघर येथील पंकज पंडित यांचा उपक्रम; घरगुती वापरानंतर उरलेली वीज महावितरणला

सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करून घरगुती गरजा भागवून उर्वरित वीज विकता आली तर? खारघरमधील पंकज पंडित यांनी त्यांच्या घराच्या आणि संस्थेच्या छतावर सौर पॅनल लावून हा प्रयोग यशस्वी करून केला आहे. त्यांच्या घरातील छतावर बसवलेल्या सौर पॅनलच्या साहाय्याने वर्षांकाठी १८०० युनिट्स वीजनिर्मिती करण्यात येत आहे.

सौर पॅनेलच्या साहाय्याने निर्माण केलेली वीज ते घरगुती उपकरणांसाठी वापरतात आणि उर्वरित वीज नेट मीटरच्या मदतीने महावितरणला विकतात. दिवसभरात किती वीज निर्माण करण्यात आली, किती वापरली आणि किती विकली, याचा तपशीलही ‘सोलार लॉक अ‍ॅप’च्या साहाय्याने मिळवता येतो. या प्रकल्पासाठी ८० हजार रुपये खर्च येतो. पाच वर्षांत हा खर्च वसूल होतो, अशी माहिती पंकज पंडित यांनी दिली. हे सौर पॅनल २५ वर्षे टिकते. २०२२ पर्यंत १ लाख गिगाव्ॉट सौर वीजनिर्मिती करणे हे सरकारचे लक्ष आहे. सौर ऊर्जेचा वापर केल्यास विजेची ५० टक्के गरज भागवता येईल, असे मत पंडित यांनी मांडले.

वीजनिर्मिती प्रक्रिया

घराच्या छतावर एका दिवसात सहा तास सूर्यप्रकाश येतो. सौर पॅनल छतावर दक्षिणेस १९ अंशांच्या कोनात लावावे लागते. त्यातील फोट वोल्ट पॅनलवर सूर्यप्रकाशाचा परिणाम होऊन वीजप्रवाह तयार होतो. यालाच डायरेक्ट करंट म्हणतात. त्याला जोडलेला इन्व्हर्टर वीज प्रवाहांचे रूपांतर अल्टरनेट करंटमध्ये करतो आणि वीजनिर्मिती होते. याला नेट मीटर जोडल्यास उर्वरित वीज महावितरणला देता येते.

सौर वीजनिर्मितीचे फायदे

वर्षांच्या १२ पैकी १० महिन्यांत आपण जास्त वीज निर्माण करू शकतो. साधारण १० बाय १०च्या जागेत ३.७६ किलो व्हॅट सोलार पॅनेल बसविल्यास ६ तासांत २२.५ युनिट्स वीज निर्माण करता येते. वर्षांच्या ३०० दिवसांत ६ तासांत दररोज ५ युनिट्स ते ६ युनिट्सप्रमाणे १८०० युनिट्स वीजनिर्मिती करता येते. हीच वीज शासनाच्या नियमानुसार १०.५ रुपये या व्यावसायिक दराने विकता येते. १८०० युनिट्स वीज देऊन वर्षांकाठी १८ हजार ९०० रुपये मिळवता येतात. या प्रकल्पासाठी लागणारा ८० हजार रुपये खर्च हा पाच वर्षांत भरून निघतो आणि पुढच्या २० वर्षे मोफत वीज मिळवता येते, असे पंडित यांचे म्हणणे आहे.

निसर्ग जे देतो, त्याचा योग्य आणि पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. सौर ऊर्जेपासून वीजनिर्मितीचा प्रकल्प संस्था, शासन स्तरावर राबविल्यास विजेची अध्र्याहून अधिक गरज भागेल.

पंकज पंडित, खारघर