वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामात तंत्रज्ञ आणि कामगारांचा अभाव

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : निसर्ग वादळाच्या तडाख्याने बुधवारी वीजपुरवठा खंडित झाला. याचा सर्वात मोठा फटका घणसोली, गोठीवली, रबाळे, पावणे आणि महापे या भागांना बसला. या परिसरात २४ तासांहून अधिक तास वीज गायब होती. ‘महावितरण’कडे सध्या तंत्रज्ञ आणि कामगार नसल्याने समस्या निर्माण झाल्या. उपलब्ध मनुष्यबळावरच दुरुस्तीची कामे करवून घ्यावी लागत आहेत.

बुधवारी दुपारी तीव्र झालेल्या निसर्ग वादळाने नवी मुंबई परिसराला झोडपले. कोपरखैरणे, जुईनगर आणि ऐरोली भागात विजेचा लपंडाव सुरू होता, तर काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे काही वृक्ष वीजपुरवठा यंत्रणेवर कोसळल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे काही भागांत वीज गेली. महावितरणच्या पथकाने काही वेळात वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला. मात्र, घणसोली गाव, ऐरोली सेक्टर- ५ ते आठ, गोठिवली, तडवळी गाव पावणे गाव, महापे गाव आणि रबाळे गाव येथील वीजपुरवठा खंडिीत झाला. याशिवाय रबाळे व पावणे औद्योगिक वसाहतींतील विद्युत यंत्रणा बंद पडली.

वादळाच्या तडाख्याने या सर्व ठिकाणी पाच फिडर ट्रान्स्फॉर्मर निकामी झाले. वादळाच्या आधी काही ठिकाणी वीज गायब होती, तर काही ठिकाणी एक वाजता वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी पाचनंतर वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

भिंत कोसळली

सध्या महावितरणच्या दुरुस्ती विभागात कमी कर्मचारी आहेत. या विभागातील बहुतेक तंत्रज्ञ करोनाकाळात गावी गेले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांची संख्या किरकोळ आहे. तर काही ठिकाणी कर्मचारीच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दुरुस्ती कामांमध्ये वेळ लागत आहे. गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घणसोली गावातील काही भागांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र, त्या ठिकाणी एका भिंतीचा काही भाग कोसळल्याने वीजवाहिनी तुटली.

बोकडवीरा परिसरातील वीज २४ तासांपासून गायब 

उरण : बुधवारी आलेल्या निसर्ग वादळामुळे विजेचा पुरवठा खंडित करण्यात आलेला होता. मात्र सायंकाळी चक्रीवादळ शांत झाल्यानंतर तालुक्यातील इतर ठिकाणची वीज आली मात्र बोकडवीरा गावात मागील २४ तासांपासून वीज गायब आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत. चक्रीवादळामुळे अनेक घरांची पत्रे उडाले तसेच नुकसानही झाले आहे. अशा वेळी वीज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विजेमुळे पाणी तसेच इतर समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

करोनाकाळात तंत्रज्ञ आणि कर्मचारी गावी निघून गेले आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे दुरुस्ती कामांना उशीर होत आहे. 

-एस. पी. गोडसे, कार्यकारी अभियंता, महापारेषण