पायाभूत सुविधांच्या नावाखाली वळती केलेली जमीन परत देण्याची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई शहर प्रकल्पात जमीन संपादित करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारने दिलेल्या साडेबारा टक्के योजनेतील पावणेचार टक्के जमीन सिडकोने पायाभूत सुविधांच्या नावाखाली वळती केली आहे. ती प्रकल्पग्रस्स्तांना परत करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नवी मुंबई नेत्या सलुजा सुतार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गुरुवारी केली. पवार यांनी मुख्यमंत्री असताना ही योजना प्रकल्पग्रस्तांसाठी लागू केलेली होती.

पालिकेच्या माजी नगरसेविका सुतार यांनी गुुरुवारी पवार यांच्या मुबंईत भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या नव्याने मांडल्या. प्रकल्पग्रस्तांचे प्रशन सोडविण्यासाठी ज्यांना ताकद दिली त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केल्याची टीका या वेळी गणेश नाईक यांचे नाव न घेता या दाम्पत्याने केली. प्रकल्पग्रस्तांचे काही प्रशन पन्नास वर्षांनंतरही सिडकोकडे प्रलंबित असून ते सोडविण्यासंदर्भात पवार यांनी राज्य शासनाला संकेत द्यावेत अशी अपेक्षा सुतार यांनी या पत्रात केली आहे. प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली गरजेपोटी घरे कायम करण्यात यावी ही जुनी मागणी तशीच पुढे करण्यात आली आहे तर नवीन विकास नियंत्रण नियमावलीत शहरांना तीन वाढीव एफएसआय देण्यात आला आहे. तो प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या गरजेपोटी घरांच्या विकसित भागातही देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता पत्रक देण्यात यावे, विद्या वेतन पुन्हा सुरू करण्यात यावे, शासनाच्या सेवेत नोकरभरती, एमआयडीसीतून प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या भूखंडांच्या किमती कमी करण्यात याव्यात. प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या साडेबारा टक्के योजनेतील ३.७५ टक्के पायाभूत सुविधा आणि विकासाच्या नावाखाली कपात करण्यात आलेले भूखंड परत देण्यात यावेत अशी मागणी सुतार दाम्पत्याने केली आहे.

महागृहनिर्माण प्रकल्पाविरोधातही तक्रार

पनवेल : मानसरोवर आणि खांदेश्वार रेल्वेस्थानकाजवळ सिडको उभारत असलेल्या महागृहनिर्माण प्रकल्पाच्या तक्रारींसाठी कामोठे येथील नागरी हक्क समितीने गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली. रेल्वेस्थानकापासून लागून असलेल्या प्रकल्पामुळे भविष्यात मुंबईप्रमाणे नवी मुंबईतही बजबजपुरी माजेल अशी भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. यावर शरद पवार यांनी प्रकल्पाची कागदपत्रे तपासून पुढे मार्गक्रमन करण्याचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी नागरिक व अध्यक्ष पवार यांची भेट घडवून आणली.