पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. तर बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या, लोकांनी या निषेध रॅल्यांना उत्फुर्त पाठींबा दिला. अलिबाग मध्ये एक्स एनसीसी कॅडेड असोसिएशनच्या वतीने निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. क्रिडाभुवन पासुन सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या रॅलीला अलिबागकरांनी मोठा प्रतिसाद दिला. शहरातील नागरीक, व्यापारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी नेते या रॅलीत मोठ्या संख्येनी सहभागी झाले.

पाकीस्तान विरोधी घोषणा देत. रॅली मारुती नाका, बालाजी नाका, ठिकरूळ नाका, शेतकरी भवन, आंबेडकर चौक, महावीर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालया जवळ दाखल झाली. शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी जिल्हा प्रशासनाला एक निवेदन सादर करण्यात आले. दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान रॅलीच्या पार्श्वभुमीवर शहरातील व्यापारी असोसिएशनने सकाळी कडकडीत बंद पाळला. सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. महाड, श्रीवर्धन येथेही दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला, महाड येथे पाकीस्तांनचे झेडे रस्त्यावर पसरवून तुडविण्यात आले.