उरण तालुका तसेच येथील वाढत्या औद्योगिकीकरणाला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील गाळाच्या पातळीचे सव्‍‌र्हेक्षण सेन्ट्रल वॉटर पॉवर रिसर्च सेंटर पुणे यांच्या पथकाने वर्षभरापूर्वी केले आहे. या गाळाच्या सर्वेक्षणाचा अहवाल एमआयडीसीला आलेला आहे. या अहवालात धरणाची पाणीक्षमता वाढविण्यासाठी उंची वाढविण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र वरिष्ठ कार्यालय अहवालावर काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.३७१२ एकरांवर रानसई धरणाची उभारणी ४६ वर्षांपूर्वी करण्यात आली. धरणातून नौदल शस्त्रागार, ओएनजीसी प्रकल्प, वायू विद्युत केंद्र, उरण शहर आणि उरण तालुक्यातील २५ ग्रामपंचायती यांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची स्थापित पाणी साठवणूक क्षमता १० दशलक्ष घन मीटरची आहे. धरणाची खोली ११६ फूट आहे. धरणाच्या उभारणीनंतर काही वर्षांतच धरणात येणाऱ्या पाण्याबरोबर आलेल्या गाळाचे प्रमाण वाढू लागले आहे. ४६ वर्षांचा गाळ धरणात साचलेला असल्याने एकूण १० दशलक्ष घन मीटर पाण्याची क्षमता असलेल्या धरणातून सध्या केवळ ७ दशलक्ष घनमीटर पाणीच वापण्यासाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे एमआयडीसीला नवी मुंबई महानगरपालिकेच्या हेटवणे तसेच एमआयडीसीच्याच बारवी धरणातून पाणी घ्यावे लागत आहे.
मार्च २०१५ मध्ये धरणातील गाळाचे सर्वेक्षण करण्यात आलेले असले तरी त्याच्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. १५ दिवसांपूर्वी हा अहवाल आला असून तो एमआयडीसीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे. या संदर्भात पनवेल विभागाचे साहाय्यक अभियंता एफ. पी. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता गाळासंदर्भातील अहवाल आला असून तो एमआयडीसीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या अहवालात धरणाची उंची वाढविण्याची शिफारस करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.