बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना भ्रांत; लॉकर्सचे भाडे देऊनही नुकसान

सुरुवातीच्या काळात नागरिकांच्या हाती मुळातच पैसे कमी असत. त्यातच बँकांची संख्याही कमी असल्याने काबाडकष्ट करून मिळवलेल्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी एका पितळेच्या डब्यात दागिने व पैसे घरातच जमिनीत लपवून ठेवण्याची रीत होती. त्या वेळच्या माणसांचे हेच लॉकर्स, परंतु या घरातील जमिनीत ठेवलेल्या पैशांचे लॉकर्स कोणी चोरटय़ांनी फोडून नेल्याचे कधीच ऐकिवात नाही; परंतु आजच्या आधुनिकतेच्या युगात नागरिकांच्या हाती असलेला पैसा व दागिने शहरात सुरक्षित नाहीत.

कधीही चोरी होते, या भीतीने नागरिक बँकेमध्ये सुरक्षा अनामत रक्कम व लॉकर्सचे भाडे देऊन बँकेच्या लॉकर्समध्ये पैसे ठेवतात; परंतु आता हेच लॉकर्स फोडून पैशांवर दरोडा टाकल्यामुळे आमच्या दागिन्यांचा व पैशांच्या सुरक्षेचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात पती-पत्नी नोकरीला जात असल्याने ते सुरक्षित अशा बँकेच्या लॉकरचा पर्याय निवडतात. लॉकर्सच्या खोलीमध्ये सीसीटीव्हीसारखी यंत्रणा नसते. तसेच या लॉकर्समध्ये काय ऐवज ठेवला याची बँकेलाही कल्पना नसल्याने बँका त्या हरवल्यास कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. अनेकदा बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच लॉकरमधील दागिने पळवल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे बँका या लॉकर्ससाठी भाडे आणि अनामत रक्कमही आकारतात. मात्र, दरोडय़ाच्या प्रकरणानंतर या चोरीच्या घटनांमुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

तसेच रक्कम आणि ऐवजाबाबत बँकही अनभिज्ञ असल्याने दरोडेखोर सापडले तरीही नेमका ऐवज मिळेल याची शाश्वती काय? असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. नागरिकांचे जबाब जरी नोंदवून घेतले तरीही अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विमा पर्यायाबाबत स्टेट बँक आणि एका खासगी बँकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ऐवजाबाबत कल्पना नसल्याने विमा काढता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे बँकेचे नियम काय आहेत त्यावरच सर्व काही अवलंबून आहे. खातेदारांसाठी आता ही सर्व प्रक्रियाच गुंतागुंतीची होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सुरक्षा पुरविण्यास कुचराई

जुईनगरमधील बँक ऑफ बडोदाच्या बाहेर केवळ एटीएमसाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे; परंतु बँकेला सुरक्षारक्षक नव्हता. हा सुरक्षारक्षक वयोवृद्ध आहे. तसेच एटीएमही रात्री १० नंतर बंद केले जाते. त्यामुळे १० नंतरच्या सुरक्षेची सोय अधिकाऱ्यांनी का केली नव्हती, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. अनामत रक्कम, भाडे आकारले जात असताना सुरक्षा पुरविण्यास बँकेने कुचराई केल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

आमचे दहा लाखांचे दागिने व २५ हजार रुपयांची रोकड गेली आहे. आमच्याकडून लॉकर्स घेताना बँकेने फॉर्म भरून घेतले होते व अनामत रक्कम घेतली होती. आमचे सगळे पैसे मिळणार कसे.. ते मिळाले तरी पोलीस वाटणार कसे, या सगळ्याच विचारांनी डोके सुन्न झालेय. चांदीच्या छोटय़ा वस्तू, पैंजण, जोडवी व इतर साहित्य त्यांनी तिथेच टाकले आहे.    – दीपाली शेलार, जुईनगर

माझे सहा तोळे दागिने गेले आहेत. ते आता परत मिळणार कसे? बँक व पोलिसांनी दोन-तीन दिवसांनी परत या, असे सांगितले आहे. माझे पती नायजेरियात आहेत. आता यापुढे पैसे, दागिने ठेवायचे कोठे असा प्रश्न आमच्यासमोर आहे.   – मुथू कुनडू, जुईनगर

बँकेच्या शेजारच्या इमारतीतच राहायला आहे. पहाटेपासूनच खातेदार जमले होते. सकाळी साडेसात वाजताच मी बँकेसमोर आलो. माझे लॉकर फोडले नसल्याचे पाहिले. मी सर्व रक्कम व दागिने लॉकर्समधून काढून घेतले. बँकेत सुरक्षित म्हणून ठेवले होते. दिवसभरात १०० पेक्षा अधिक खातेदारांनी लॉकर्समधून आपले पैसे व दागिने काढून नेले.   – अजीज शेख, जुईनगर