पनवेल शहरामधील सोनसाखळी चोरी, घरफोडय़ा आणि वाहनचोरीचा आकडा वाढल्याने पोलीस हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले असून चोरटय़ांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केल्याचे दिसत आहे. पनवेल बस डेपोसमोर गेल्या आठवडय़ात झालेल्या खून प्रकरणाला पोलीस अद्याप वाचा फोडू शकले नाहीत, तसेच सोनसाखळीचोरांचा छडा लावण्यातही पोलिसांना अपयश आले आहे.
चालू वर्षांमध्ये शहर पोलीस ठाण्याच्या दफ्तरी घरफोडी, सोनसाखळी चोरी आणि वाहनचोरी यांच्या तब्बल १०६ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यापैकी १२ सोनसाखळीचोरांना पकडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तर, २६ घरफोडय़ांपैकी १२ घरफोडय़ांतील आरोपींपर्यंत पोहोचल्याचे पोलीस सांगत आहेत.
वाहनचोरीच्या तब्बल ६१ घटना पनवेल शहरात घडल्या असून या चोरटय़ांनी सामान्य पनवेलकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. वाहनचोरीच्या केवळ ७ घटनांना पोलीस वाचा फोडू शकले आहेत. भाऊबीजेच्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या मंगळसूत्रचोरीच्या दोन घटनांतील गुन्हेगारही अद्याप मोकाट आहेत.
दरम्यान नगरपालिकेने शहरातील प्रमुख ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी अपेक्षा साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.