उरणमध्ये कोटय़वधी खर्चूनही स्वच्छतेचे तीनतेरा

उरण तालुका सिडको, जेएनपीटी तसेच उरण नगरपालिका अशा तीन आस्थापनात विभागलेला असून या तीन विभागांकडून मान्सून पूर्व नालेसफाईसाठी जवळपास पावणेदोन कोटीं रुपयांची कंत्राटे देण्यात आलेली आहेत. मात्र कामे वेळेवर पूर्ण होत नसल्याने तसेच कामांमध्ये कामचुकारपणा केल्याने दरवर्षी उरण शहरासह अनेक गावांना पावसाळ्यात पाणी शिरण्याच्या घटनांत वाढ झालेली आहे. यावेळी नालेसफाईची कामे तसेच चार महिने नाल्यात कचरा आणि गाळ साचणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटनात कमी येईल, असा विश्वास या आस्थापनांकडून व्यक्त केला जात आहे.

उरण तालुक्यातील भूभाग हा सखल विभागात मोडतो. तसेच अरबी समुद्र आणि खाडी किनारचा परिसर असल्याने पावसाचे पाणी व भरतीचे पाणी एकाच वेळी आल्यानंतर अनेक ठिकाणी पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे शहरातील तसेच गावातील सखल भागात पाणी शिरते. यामध्ये सध्या या परिसरात सुरू असलेल्या विकास कामांसाठी नैसर्गिक नाले बुजविले जात आहेत. त्याचबरोबर मुख्य नाले व गटारातून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे नाले तुंबले आहेत. त्यामुळेही पाणी शिरू लागले आहेत. उरणमध्ये सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयाकडून जवळपास दीड कोटींची कामे काढली आहेत. तर उरण नगरपालिकेने २७ नाले साफ करण्यासाठी १९ लाखांचे काम काढले आहे. त्याचप्रमाणे जेएनपीटी परिसरातील गावे व जेएनपीटी विभागातील नालेसफाईसाठी ५ लाखांची कंत्राटे काढण्यात आलेली आहेत. सिडकोची मान्सूनपूर्व कामे म्हणजे टक्केवारीतच वाहून जात असल्याची अनेक वर्षांची नागरिकांची तक्रार आहे. असे असले तरी यावेळी सिडकोने कंत्राटदारांकडून नालेसफाईचे काम करून घेणे तसेच चार महिने या नाल्यातील सफाईची जबाबदारीही कंत्राटदारावर टाकली असल्याची माहिती द्रोणागिरी नोडचे कार्यकारी अभियंता रवींद्र गडकरी यांनी दिली. त्यांच्याकडील काळाधोंडा तेलीपाडा, करंजा, बालई, चाणजे, फुंडे, डोंगरी, बोकडविरा व नवीन शेवे या परिसरांतील नालेसफाईसाठी ४० लाखांची कामे काढण्यात आली आहेत. तर दुसरे अधिकारी भरत ढगे यांनी भेंडखळ, नागाव व म्हातवली करिता जवळपास २३ लाखांची तसेच साठवणूक तलाव परिसरातील फ्लॅपसाठी ८ लाख ९० हजारांची कामे काढली आहेत. त्याच प्रमाणे नवघर, पागोटे व कुंडेगाव विभागातही कामे काढण्यात आलेली आहेत. उरणमधील सिडकोच्या साठवणूक तलावातील गाळाची अडचण कायम- सिडकोच्या नवघर, भेंडखळ तसेच नवीन शेवे व फुंडे या परिसरात कोटय़वधी रुपये खर्च करून साठवणूक तलाव तयार केलेले आहेत. दहा वर्षांपासून या तलावात गाळ साचून त्यावर खारफुटी उगवल्याने पाणी साठवता येत नाहीत. त्यासाठी परवानगी मागणारी याचिका न्यायालयात प्रलंबित आहे.