‘मी माझ्या राजकीय कारकीर्दीच्या ५२ वर्षांत २७ वर्षे सत्तेबाहेर होतो. सत्तेबाहेर राहून अधिक जोमाने काम केले. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणारे विकासासाठी जात आहे, असे सांगतात, तेव्हा गंमत वाटते. पण, पक्ष सोडणाऱ्यांना मतदारच धडा शिकवतील,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथील मेळाव्यात दिला.

‘कोणी सोडून गेले त्याची काळजी करू नका. जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे. नवी मुंबईतून गेल्या वेळी मंदा म्हात्रे निवडून येतील, असे वाटले नव्हते. पण, आपल्याच माणसाची चूक होती म्हणून ते पराभूत झाले,’ अशा शब्दांत गणेश नाईक यांचा नामोल्लेख टाळत पवार यांनी त्यांना लक्ष्य केले. नवी मुंबईसाठी अनेक प्रकल्प उभारले आहेत. त्यात पक्षाचाच मोठा वाटा आहे. आता नव्याने पक्षबांधणी करून यश मिळवू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

चुकीच्या धोरणांमुळे मंदी

गेल्या पाच वर्षांत १६  हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशातील मंदी आणि बेरोजगारी हे सरकारचे अपयश आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात मंदी आली आहे. नवी मुंबईतील बेलापूर पट्टय़ातील अनेक उद्योगधंदे बंद पडू लागले आहेत. कष्टकऱ्यांच्या हाताला काम देण्याचे धोरण राज्यकर्त्यांनी राबवायला हवे. मात्र, सध्याचे सत्ताधारी मूठभर धनिकांसाठी निर्णय घेत आहेत, असा आरोप करत पवारांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.

नेतृत्व दिले हीच चूक : पाटील

नवी मुंबईतील विकासाच्या मागे शरद पवार यांची कल्पकता आहे. नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत, म्हणून मी जातो असे म्हणणाऱ्यांना आम्ही नेते केले, पण ती पक्षाची चूक होती, अशी कबुली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. सत्तेशिवाय जगता येत नाहीत म्हणून ते गेले असा टोलाही त्यांनी लगावला. सरकारने पाच वर्षांत एकही प्रकल्प पूर्ण केला नाही. नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण २०१६ ला होणार होते. अद्याप त्याचा पत्ता नाही, अशी टीका त्यांनी केली.