मोर्चात शेकापचा सिडको प्रशासनला सवाल
खारघर वसाहतीत सोमवारी सिडको प्रशासनाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दक्षिण नवी मुंबईच्या स्मार्ट सिटीसाठी उद्याने आणि तलावाच्या बांधकामांचे भूमिपूजन केले. मात्र ज्या कामाची सिडकोकडून निविदाच काढण्यात आलेली नाही. त्याचे भूमिपूजनच कसे काय होते? कामाची रीतसर परवानगी सिडको आणि आमदार तसा देखावा का करीत आहेत, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. खारघर वसाहतीतील विविध समस्यांसाठी शेकापने मंगळवारी मोर्चा काढला. शिल्पचौक ते वसाहती रस्ता अशी फेरी काढण्यात आली. सिडकोच्या स्थानिक कार्यालयासमोर मोर्चाची समाप्ती झाली. या वेळी शेतकरी कामगार पक्षाने आमदार ठाकूर आणि सिडकोवर टीकास्त्र सोडले.
शेतकरी कामगार पक्षाने फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळावी आणि वसाहतीतील प्रश्न सिडकोने प्राधान्याने सोडविण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
मोर्चात माजी आमदार विवेक पाटील आणि शेकापचे सरचिटणीस बाळाराम पाटील हे सहभागी झाले होते. खारघरसाठी नाटय़गृह, उद्याने, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही या वेळी नेत्यांनी दिला.

सिडको प्रशासनाने रीतसर ई-निविदा काढूनच उद्यानांच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा सोहळा अधिकृतच आहे. भूमिपूजन सोहळ्यात सरपंच उपस्थित होते. निविदा काढून कंत्राटदारांना कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– प्रदीप डहाके, सिडकोचे खारघर वसाहतीचे प्रशासक