नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी शिवसेनेचे शिवराम पाटील यांची निवड झाली. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जयवंत सुतार यांचा पराभव केला. पाटील यांना आठ, तर सुतार यांना सात मते मिळाली.
पालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार, तर शिवसेनेचे शिवराम पाटील रिंगणात होते. १६ सदस्य असलेल्या समितीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका अपर्णा गवते यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा एक सदस्य कमी झाला. स्थायी समितीतील पक्षीय बलाबल राष्ट्रवादी ७, शिवसेना ६, भाजप आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक असे होते. निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुतार यांना सात मते मिळाली. युतीच्या शिवराम पाटील यांना आठ मते मिळाली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी काम पाहिले.
नगरसेविका अपर्णा गवते यांनी स्थायी समितिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. या वेळी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार आणि शिवसेनेचे शिवराम पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. काँग्रेसच्या मीरा पाटील यांनी शिवराम पाटील यांना मत दिले. त्यामुळे पाटील एक मताने विजयी झाले. या वेळी खासदार राजन विचारे, भाजप आमदार मंदा म्हात्रे, शिवसेना उपनेते विजय नाहटा आदींनी सभागृहात येऊन पाटील यांचे अभिनंदन केले.

महापौरांनी सोमवारी विशेष महासभा घेऊन प्रकाश मोरे यांची नियुक्ती केली; परंतु निवडणूक अधिकारी शीतल उगले यांनी प्रक्रियेस आरंभ करण्यापूर्वी शिवराम पाटील, एम. के. मढवी यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी महासभा रद्द करण्याचे आदेश देऊनही नवीन स्थायी समिती सदस्य निवडण्यात आली आहे. त्यामुळे ही निवड चुकीची आहे, असे सांगितले. यावर सुतार यांनी हा महापौरांचा अधिकार आहे. नवनियुक्त सदस्यांना मतदानास अनुमती द्यावी, अशी मागणी केली; परंतु पीठासन अधिकाऱ्यांनी सभापती निवडीसाठी सर्व सदस्यांना तीन दिवस अगोदर नोटीस देणे बंधनकारक आहे, अशी विचारणा केली. याच वेळी अशा प्रकारे किती जणांना नोटिसा दिल्याची माहिती द्यावी, अशी सूचना सचिवांना केली. यावर सचिवांनी तीन दिवसांपूर्वी १५ जणांना नोटिसा दिल्याचे स्पष्ट केले. या वेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी ज्या सदस्यांना तीन दिवसांपूर्वी नोटीस मिळाली आहे, त्यांनाच निवडणुकीत भाग घेता येईल, असे स्पष्ट केले.