News Flash

लसींचा अघोषित तुटवडा

पालिकेकडे कोणतेही वाहन नसल्याने लसी कशा आणाव्यात, हा प्रश्न पनवेलच्या आरोग्य विभागाला पडला.

पनवेलमध्ये गर्भवती, बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

संतोष सावंत, पनवेल

१५ दिवसांपासून पनवेल शहर महापालिकेच्या आरोग्य विभागात बालकांना व गर्भवतींना दिल्या जाणाऱ्या विविध लसी उपलब्ध नसल्याने सामान्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. नागरिकांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर अलिबाग येथील जिल्हा आरोग्य विभागाकडून लसी आणण्यासाठी वाहन पाठविले नसल्याने हा तुटवडा भासत असल्याचे उजेडात आले आहे. पनवेल पालिकेच्या आरोग्य खात्याने नवीन रुग्णालयाच्या नोंदणीला प्राथमिकता दिल्याने बालक व गर्भवती मातांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ‘सुरक्षित मातृत्व व सुरक्षित बालक’ या ब्रीदवाक्य अंगीकृत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाची कार्यपद्धत या उलट आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लसींचा तुटवडा नसताना सामान्यांची बालके १५ दिवसांपासून लसीकरणापासून वंचित राहिली आहेत. सरकार एकीकडे कोटय़वधी रुपये खर्च करून लसीकरणाची मोहीम राबवते. मात्र महिन्याला सुमारे एक हजार बालकांना व गर्भवती मातांना विविध लसींची आवश्यकता असताना मागील १५ दिवसांपासून अघोषित तुटवडय़ाला सामान्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पालिका क्षेत्रातील विविध आंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पोलिओ, ओरल पोलिओ, गोअर रुबेला, पेन्टावायलन (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, मेंदूज्वर, कावीळ), बीसीजी अशा व इतर लसींचा तुटवडा आहे.

कळंबोली येथे राहणारे विश्वजीत गुजरे हे मंगळवारी त्यांच्या साडेतीन महिन्यांच्या मुलीला लस टोचण्यासाठी सेक्टर पाच येथील समाज मंदीर येथील आरोग्य केंद्रात घेऊन गेल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मागील १५ दिवसांपासून गुजरे हे पनवेल पालिकेच्या कळंबोली येथील आरोग्य केंद्रात दोन वेळा साडेतीन महिने वयाची लस टोचण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. मंगळवारी गुजरे यांना सकाळी ते राहात असलेल्या घराजवळील आंगणवाडीत लस दिली जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर गुजरे तेथे गेल्यावर तेथे रांगेत उभ्या असलेले इतर पालकही लस उपलब्ध नसल्याने लस क धी येणार या प्रतीक्षेत होते. अखेर गुजरे यांनी पालिकेचे सदस्य गोपाळ भगत यांच्याशी संपर्क साधला. नगरसेवक भगत यांनी आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम यांच्याशी वार्तालाप केल्यावर लस अलिबाग येथील जिल्हा आरोग्य विभागाकडून पालिकेने आणली नसल्याचे कळाले. पालिकेकडे कोणतेही वाहन नसल्याने लसी कशा आणाव्यात, हा प्रश्न पनवेलच्या आरोग्य विभागाला पडला.

कोणत्या लसी कधी देतात..

* बाळ जन्म झाल्यावर – क्षयरोग प्रतिबंधक (बीसीजी), पोलिओ प्रतिबंधक (ओपीव्ही), काविळी प्रतिबंधक (हॅपॅटायसीस बी),

*  दीड महिने – पोलिओ इंजेक्शन, ओपीओ, पेन्टा वायलेन

*  अडीच महिन्याला – पोलिओ ओपीव्ही, पेन्टावायलेन इंजेक्शन

*  साडेतीन महिन्याला – पोलिओ इंजेक्शन, पेन्टा वायलेन इंजेक्शन

* गर्भवती -एक महिन्याच्या अंतराने धनुर्वाताच्या दोन लसी दिल्या जातात.

* मागील १५ दिवसांपासून लसीचा तुटवडा आहे हे समजण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना १५ दिवस लागल्याचा संताप नागरिक विश्वजीत गुजरे व इतरांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. सध्या पनवेल पालिका क्षेत्रातील अनेक आंगणवाडी सेविकांकडे काही मोजक्या गोअर प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. त्याही लवकर संपणार आहेत.

वाहन नसल्याची सबब

आरोग्य विभागाला दोन रुग्णवाहिका वगळता इतर कोणतेही वाहन नसल्याचा दावा तेथील अधिकारी करतात. मंगळवारच्या लसींच्या तुटवडय़ाच्या चर्चेनंतर अजून दोन दिवसांनी रुग्णवाहिका पाठवून पालिका लसी मागविणार असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगीतले. याबद्दल पनवेल पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्याशी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही.

आरोग्य विभागाकडे दोन रुग्णवाहिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एक वाहन पालिकेने उपलब्ध केले आहे. राष्ट्रीय लसीकरणाच्या कार्यक्रम याच रुग्णवाहिकेतून सुरू असतो. प्रत्येक बुधवारी रुग्णवाहिका अलिबागला कामानिमित्त पाठविण्यात येते. मात्र अधिकाऱ्यांचे नियोजन चुकल्याने मागील दोन आठवडय़ात अलिबागचा फेरा झालाच नाही.

वाहन न मिळणे हे काही कारण असू शकत नाही. मी स्वत: विविध आजार प्रतिबंधक लसी का उपलब्ध होऊ  शकल्या नाहीत याची माहिती घेतो. उद्याच लस कशा उपलब्ध होतील, याची तातडीने कार्यवाही करण्यात येईल.      

-डॉक्टर प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, पनवेल पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 12:54 am

Web Title: shortage of vaccines for children and pregnant women in panvel health department
Next Stories
1 हापूस आंब्यावर ‘एफडीए’ची नजर
2 समुद्राच्या पाण्यावर पनवेलकरांची तहान भागविणार?
3 महामुंबई क्षेत्रात २४ हजार घरे विक्रीविना?
Just Now!
X