24 January 2019

News Flash

भुयारी मार्ग दृष्टिपथात

प्रस्तावित भुयारी मार्गाला महापालिकेत २०१५ मध्ये परवानगी मिळाली होती

पामबीच ओलांडणाऱ्या करावेतील ग्रामस्थांना दिलासा मिळण्याची चिन्हे

नेरुळ येथील करावे गावातील मच्छीमारांना जीव धोक्यात घालून पामबीच मार्ग ओलांडावा लागू नये म्हणून गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेली भुयारी मार्गाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. येथे पामबीच मार्ग ओलांडताना झालेल्या अपघातांत आजवर १३ जणांना प्राण गमावावे लागले आहेत.

प्रस्तावित भुयारी मार्गाला महापालिकेत २०१५ मध्ये परवानगी मिळाली होती, मात्र वाहतूक विभागाच्या परवानगीअभावी हे काम रखडले होते. पावसाळ्याचे व वाहतूककोंडीचे कारण देत वाहतूक विभागाने ही परवानगी नाकारली होती. वाहतूक विभागाने कोंडी होऊ  नये म्हणून सेवा रस्त्याची बांधणी करावी अशी मागणी केली होती.

करावे गावात बहुसंख्य रहिवासी मासेमारी करतात. खाडीच्या दिशेने जाण्यासाठी त्यांना पामबीच मार्ग ओलांडावा लागतो. या मार्गावरून अतिशय वेगात वाहने जात असल्यामुळे आजवर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा म्हात्रे गेल्या सात वर्षांपासून भुयारी मार्गासाठी पाठपुरावा करत होत्या. त्यानंतर स्थानिक नगरसेवक विनोद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तेथे रास्ता रोको केला होता. पालिकेने एक कोटी ९४ लाख तीन हजार १७४ रुपये खर्चाच्या कामाला मंजुरी दिली होती. पंरतु पावसाळ्याचे कारण सांगून वाहतूक विभागाने ही परवानगी नाकारली. आयुक्तांच्या मान्यतेने कामाची मुदतही वाढवून घेण्यात आली आहे. नुकतीच या कामाला सुरुवात करण्यात आली असून पामबीच मार्गाला समांतर सेवा रस्त्याचे काम झाल्यानंतर या ठिकाणची वाहतूक वळवून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

१७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी स्थलांतरित करावी लागणार आहे. या कामाचाही ३२ लाख ६४ हजार ४३१ रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

करावे गावाजवळ पामबीच मार्गावर पादचारी भुयारी मार्ग मंजूर होऊनही काम सुरू झाले नव्हते. याबाबत गेल्या आठ वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. मच्छीमारांना जीव मुठीत घेऊन पामबीच मार्ग ओलांडावा लागतो. काम पूर्ण करण्यासाठी २८ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

विनोद म्हात्रे, नगरसेवक

करावे भुयारी मार्गाबाबत वाहतूक विभाग सकारात्मक आहे. या कामासाठी वाहतूक वळवावी लागणार आहे. पालिकेला परवानगी दिली असून सेवा रस्त्याचे काम होताच पादचारी भुयारी मार्गाच्या कामासाठी पामबीच मार्गावरील वाहतूक वळविण्यात येईल.

नितीन पवार, उपायुक्त, वाहतूक विभाग

पामबीच मार्गावरील पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. सेवा रस्त्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासूनची करावे ग्रामस्थांची पादचारी भुयारी मार्गाची मागणी पूर्ण होणार आहे.

मोहन डगावकर, शहर अभियंता, नमुंमपा

First Published on February 10, 2018 12:38 am

Web Title: subway on palm beach road nmmc