विरार :  वसईतील महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची मोठी दुरवस्था झाली आहे. ही इमारत  धोकादायक असूनही येथे अनेक कर्मचाऱ्यांच्या गाडा जीव मुठीत घेऊन सुरू आहे.  कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वसई पूर्व येथे महावितरण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी १९८५ साली या इमारती बांधण्यात आल्या होत्या. या वसाहतीत २२ इमारती असून यामध्ये २५० सदनिका आहेत. यातील अनेक सदनिकांमध्ये कर्मचारी आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. परंतु या इमारती अनेक वर्षे जुन्या असल्याने  त्या  अंत्यत धोकादायक अवस्थेत पोहचल्या आहेत. यातील बहुतांश इमारतींना तडे गेले आहेत, तर काही ठिकाणच्या भागातील काँक्रीट निखळून खाली पडले आहे. त्यामुळे लोखंडी सळ्या बाहेर दिसू लागल्या आहे. धोकादायक असलेल्या इमारतींचे संरक्षणात्मक परिक्षण करण्यात आली असल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे. मात्र तरीही या इमारतीत मोठ्या संख्येने नागरिक राहत आहेत. लहानमुले ही याच आजूबाजूच्या भागात खेळत असतात. याबाबतची माहिती बांधकाम विभागाला कळविली असून  त्यानुसार दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे महावितरण विभागाने सांगितले.