रेल्वेच्या कामांसाठी ऑक्टोबर उजाडणार

नेरुळ-उरण रेल्वेमार्गातील नेरुळ-खारकोपर या टप्प्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोला दिले असले, तरी प्रत्यक्षात या टप्प्यावर सेवा सुरू होण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त गाठावा लागण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात मंत्रालयात मुख्य सचिव, रेल्वे व सिडकोचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली, त्यात ऑक्टोबरअखेपर्यंत या मार्गावरील कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे सिडको व रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात दिवाळी सुरू होणार आहे. त्यामुळे  या मार्गावर लोकल धावण्यासाठी दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर लोकेश चंद्र यांनी गृहप्रकल्पांबरोबरच नेरुळ-खारकोपर रेल्वेमार्ग तसेच मेट्रोच्या कामांना प्राधान्य दिले आहे. त्यांनी या मार्गावरील स्थानकांच्या कामांची पाहणी केली. नेरुळ-खारकोपर मार्गावरील सीवूड्स, बामणडोंगरी, खारकोपर स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. तरघर स्थानकातील स्लॅबचे काम सुरू आहे. २१ ऑगस्टला तरघर स्थानकातील स्लॅबचे काम झाल्यानंतर ही स्थानके सिडकोला हस्तांतरित  करण्यात येणार आहेत. सिडकोने स्थानके रेल्वेला हस्तांतरित केल्यानंतरही रेल्वेची कामे पूर्ण होण्यास ऑक्टोबर उजाडणार आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सुरू होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत.

सागरसंगम स्थानक प्रस्तावित असून तिथे काम सुरू झालेले नाही. तरघर स्थानक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना होणार असून सीवूड्स, बामणडोंगरी, खारकोपर या स्थानकांचे सिडकोचे काम जूनपर्यंत तर तरघर स्थानकाचे काम जुलैपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना चंद्रा यांनी संबंधितांना दिल्या होत्या. सीवूड्स, बामणडोंगरी आणि खारकोपर स्थानकांचे अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. सर्वात मोठा अडथळा तरघर स्थानकाचा आहे. त्याचे काम सर्वात शेवटी सुरू झाले. हे स्थानक भव्य असणार आहे. त्यामुळे रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी या स्थानकातील कामे पूर्ण केल्यानंतर ते ट्रॅक, ट्रॅक्शन आणि टेलिकम्युनिकेशनसाठी रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

सीवूडस् ते खारकोपर या पहिल्या टप्प्याचे अंतर १२ किमी आहे. पुढे खारकोपर ते उरण हे अंतर १५ किमी आहे. एकूण २७ किमीचे हे रेल्वे जाळे विकसित करण्यासाठी सिडकोकडून ६७ टक्के व रेल्वेकडून ३३ टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे.

मंत्रालयात राज्य सरकार, सिडको व रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. सिडकोने सीवूड्स, बामणडोंगरी, खारकोपर या स्थानकांची कामे जवळजवळ पूर्ण केली आहेत. तरघर स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. २१ ऑगस्टला या स्थानकातील रेल्वेला आवश्यक असलेली कामे पूर्ण करून देण्यात येणार आहेत. ऑक्टोबर अखेपर्यंत रेल्वेची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

– एस. के. चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको रेल्वे प्रकल्प