ऐरोली, सेक्टर २० येथील शनी मंदिरासमोरील उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीखाली अनधिकृत प्रार्थनास्थळांचे व बांधकामाचे पेव फुटले आहे. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली कोणतेही बांधकाम करण्यास मनाई असतानादेखील प्रभाग अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर ही बांधकामे सुरू आहेत. सिडकोच्या अतिक्रमण पथकाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्यांखाली असणाऱ्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे व प्रार्थनास्थळे बांधण्याचे काम सुरू आहे. अशी बांधकामे करून जागा हडप करण्याचा या राजकारण्यांचा प्रयत्न आहे. या भूखंडावर प्रार्थनास्थळे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच व्यावसायिक गाळे बांधण्याचे काम सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोने या भूखंडावर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकामकरू नये आणि उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीखाली कोणीही वास्तव्य करू नये असा शासकीय अध्यादेश असतानादेखील त्यावर कारवाई तर सोडा, परंतु फलक उभारूनही जनजागृती केलेली नाही. त्यामुळे तेथे अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.
या संदर्भात ऐरोली विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले, या संदर्भात सिडकोला पत्रव्यवहार केला आहे. सिडकोने ही जागा पालिकेला हस्तांतरित केली नसल्याने यावर पालिका कारवाई करू शकत नाही, हा भूखंड सिडकोचा असल्याने या जागेवर सिडकोने कारवाई करावी.
सिडकोचे अतिक्रमण अधिकारी योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.