कोपरखरणेतील प्रकार; बेकायदा बांधकामांची झाडाझडती!

कोपरखैरणे सेक्टर १६ मधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्याला कारणीभूत येथील बेकायदेशीर बांधकामे आहेत. या बांधकामांमुळे या वसाहतींची संख्या आवश्यकतेपेक्षा जास्त वाढली असून मलवाहिन्यांवर ताण आला आहे. त्यामुळे या वाहिन्यांतील दरुगधीयुक्त पाणी बाहेर येऊ लागले असून त्यातून मोठय़ा प्रमाणात किडे रहिवाशांच्या घरात जाऊ लागले आहेत. येथील बेकायदेशीर बांधकामांवर कृपादृष्टी असणाऱ्या अधिकाऱ्यांची आयुक्तांनी चांगलीच कानउघाडणी केली असून त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.

नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात बेकायेदशीर बांधकामे आजही सुरू आहेत. त्याकडे पालिका व सिडकोचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून या बेकायदेशीर बांधकामांतून मलई जमा करण्याचे तंत्र सुरू आहे. याच मलईदार विभागातील सिडकोचे दोन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सोमवारी सापडले आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांत यापेक्षा काही वेगळे सुरू नाही. कोपरखैरणे विभागात ९०० पेक्षा जास्त बेकायदेशीर बांधकामे झालेली आहेत. ही सर्व बेकायदेशीर बांधकामे येथील प्रभाग अधिकारी, साहाय्यक आयुक्त आणि अनधिकृत बांधकामविरोधी पथकाच्या कृपाशीर्वादाने झालेली असल्याची चर्चा आहे. यासाठी एका बांधकामामागे ५० हजार रुपयांची लाच घेतली जाते. ही लाच घेऊनच या बेकायदेशीर बांधकामांकडे कानाडोळा केला गेला आहे. लोकप्रतिनिधी किंवा प्रसारमाध्यमांनी यावर आवाज उठविल्यानंतर थातुरमातुर कारवाई केल्याचे नाटक केले जाते. कारवाई पथकाची पाठ वळल्यानंतर ही बांधकामे पुन्हा नव्याने उभी राहात आहेत. कारवाई करताना ती जुजबी केली जात असल्याने पुढील बांधकाम करणे सोपे जात असून यात बांधकाम व्यावसायिक व पालिकेच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे जगजाहीर आहे. या बेसुमार बेकायदेशीर बांधकामांमुळे उपनगराची लोकसंख्या तिप्पट वाढली आहे. त्याचा ताण येथील पायाभूत सुविधांवर पडू लागला असून जुनी गटारे व जलवाहिन्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे भर वसाहतींमधून जाणाऱ्या मलवाहिन्यांतील मल भर रस्त्यावर दिसू लागला आहे.

या दरुगधीयुक्त पाण्यातून मलवाहिन्यांतील किडे बाहेर येऊन रहिवाशांच्या घरात जाऊ लागले आहेत. त्यामुळे घराचा दरवाजा उघडणे रहिवाशांना कठीण झाले आहे. दरुगधीमुळे नाक मुठीत घेऊन घराबाहेर पडावे लागत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून रहिवाशी पावसाळ्यापूर्वीच आजारी पडू लागले आहेत. सेक्टर १६ मधील ताम्हाणे यांच्या १२६ क्रमांकाच्या घरात अशा प्रकारचे किडे आढळून आले आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी मोटार पंप लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे पाणी खेचून घेतले जात असून पुढच्या घरांना पाणी समस्या निर्माण होत आहेत.

या समस्या बेकायदेशीर बांधकामांमुळे निर्माण झाल्या असून ही बांधकामे पालिका अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे झालेली आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त रामास्वामी यांनी मंगळवारी येथील साहाय्यक आयुक्त अशोक मढवी यांची चांगलीच कानउघाडणी केली. या विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांच्यावर आयुक्तांची मर्जी असल्याचे दिसून आले. त्यामुळे केवळ साहाय्यक आयुक्तांवर कारवाईचे संकेत मिळाले आहेत.

आयुक्तांच्या शांत स्वभावाचा फायदा

पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी सहा हजारांपेक्षा जास्त नागरी कामे सुरू केली असून काही प्रगतिपथावर आहेत. आयुक्तांच्या या शांत स्वभावाचा फायदा काही अधिकाऱ्यांनी घेतला असून यात उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांचा क्रमांक आहे. त्यामुळे बेकायेदशीर बांधकामांबाबत आयुक्तांची दिशाभूल केली जात असून शहरात मोठय़ा प्रमाणात बेकायेदशीर बांधकामे आजही सुरू आहेत. यात मोठे अर्थकारण दडलेले आहेत. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात या सर्व बेकायेदशीर बांधकामांना आळा बसला होता.