नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेले महिने घाऊक बाजारात दर स्थिर होते. मागील आठवडय़ात भाज्यांचे दर स्थिर होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रोज ५०० ते ५५० गाडय़ांची आवक होत आहे. करोनामुळे बाजारात दाखल होणाऱ्या  गाडय़ांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे ३००च्या आसपास  गाडय़ा बाजारात दाखल होत आहेत.

मंगळवारी बाजारात २६३ तर बुधवारी २८५ गाडय़ांची आवक झाली. मात्र, बाजारात भाज्यांच्या दरात दहा टक्के वाढ झाली. मागील आठवडय़ात १५ ते २० रुपये प्रतिकिलो असलेले भाज्यांचे दर बुधवारी २५ ते ४५ रुपयांवर गेले होते.

यात भेंडी आणि गवारी या भाज्यांची  दरवाढ झाली. ३५ ते ४० रुपये किलो असलेली गवार आता ४० ते ४५ रुपयांवर गेली आहे. भेंडीचा किलोचा दर ३० ते ३५ रुपये झाला आहे.  फरसबी ५५ ते ६० रुपये, वाटाणा  ६५ते ७०  रुपये, हिरवी मिरची ३० ते ३५ रुपये, फ्लॉवर १६ ते २० रुपये, सिमला मिरचीचा किलोचा दर ३२ ते ३६ रुपयांवर गेला आहे.

कोथिंबीर, मेथी महाग

कोथिंबीर, मेथी आणि पालक यांच्याही दरात वाढ झाली आहे. यात कोथिंबीरीची एक जुडी २५ ते ३० रुपयांना विकली जात आहे. मेथीची जुडी २० ते २५ रुपयांना  विकली जात आहे. पालक ८ ते १० रुपयांना उपलब्ध आहे.