नवी मुंबई महानगरपालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा वादग्रस्त ठरलेला स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा शुक्रवारी अखेर महासभेत मंजूर करण्यात आला. या वेळी चौगुले हे अनुपस्थित होते; मात्र चौगुलेसमर्थक नगरसेवक बहादूर बिस्ट,  गवते व मनोज हळदणकर यांनी अशा प्रकारे राजीनामा मंजूर होऊ शकत नसल्याचे सांगत आक्षेप घेतला.

महापौर जयवंत सुतार यांनी विषय पत्रिकेवरील विजय चौगुले यांच्या स्थायी समिती सदस्यपदाच्या राजीनाम्याचा विषय पुकारताच शिवसेनेचे नगरसेवक बहादुर बिस्ट, जगदीश गवते व मनोज हळदणकर यांनी राजीनामा पत्राला आक्षेप घेतला. या प्रकरणी चौगुले यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार करून राजीनामा पत्रावरील सही स्वत:ची नसल्याचा दावा केला आहे. तसेच या पत्रावर जावक क्रमांकदेखील नाही. यासाठी खोटय़ा लेटरहेडचा वापर करण्यात आला आहे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हळदणकर यांनी केली. त्यावर जयवंत सुतार यांनी चौगुले यांनी राजीनामा पत्रावर घेतलेल्या आक्षेपात सही खोटी असल्याचा उल्लेख केला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच चौगुले यांच्याकडून महापौर कार्यालयात आलेल्या अनेक पत्रांना जावक क्रमांक नसल्याचे सांगत विरोधकांचा मुद्दा खोडून काढला.

याबाबत सचिवांनी लेखी खुलासा दिला आहे. आयुक्तांनीही याबाबत अहवाल मागितला आहे, असे सुतार यांनी स्पष्ट केले. तरीही विरोधकांचे समाधान न झाल्याने चौगुले यांनी सचिव विभागाकडे केलेला पत्रव्यवहार वाचून दाखविण्यात आला. यामध्ये चौगुले यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचे नमूद करून त्या जागेवर कोणाचीही नेमणूक करू नये किंवा त्या संबंधित कोणतीही कार्यवाही करू नये, असे म्हटले आहे. तसेच या तथाकथित राजीनाम्याची माहिती मिळावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.

त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर म्हणाले की, ‘शिवसेनेत अशी शिस्त आहे की, पक्षाचे लोकप्रतिनिधी कधीही थेट महापौरांकडे राजीनामा न देता प्रथम पक्षप्रमुख किंवा नेत्यांकडे देतात. असे असले तरी चौगुले यांचा राजीनामा पालिका अधिनियमानुसार मंजूर करावा. त्या राजीनाम्यावर कोणाला आक्षेप असेल, तर त्याची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी. हा राजीनामा अधिकृत समजावा, हे मी गटनेता म्हणून स्पष्ट करत आहे.’  दरम्यान विजय चौगुले यांच्या या तथाकथित राजीनामा नाटय़ामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे सभागृहात दिसून आले.

सदस्य नियुक्ती पुढील महासभेत

सदस्य नेमणुकीसाठी शिवसेनेकडून अद्याप कोणाचेही नाव न आल्याने सदस्य नियुक्तीचा विषय पुढील महासभेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावा, अशी मागणी भोईर यांनी केली. त्यावर महापौर जयवंत सुतार यांनी या प्रकरणाची आवश्यकतेनुसार चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तोपर्यंत हा राजीनामा मंजूर करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.